Join us

या कारणामुळे सई ताम्हणकर मराठी चित्रपटापासून दुरावली!, जाणून घ्या याबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2021 12:54 IST

सई गेल्या बऱ्याच काळापासून मराठी चित्रपटात फार कमी पहायला मिळाली. एका मुलाखतीत सईने याबाबत खुलासा केला आहे.

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सई ताम्हणकर हिने विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. सई ताम्हणकरने छोट्या पडद्यावरून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. सईने मराठीसोबतच हिंदी चित्रपटसृष्टीत काम केले आहे. तिने हंटर, लव्ह सोनियो या हिंदी चित्रपटात काम केले आहे. नुकतीच ती मिमी या हिंदी चित्रपटात पहायला मिळाली. मात्र सई गेल्या बऱ्याच काळापासून मराठी चित्रपटात फार कमी पहायला मिळाली. एका मुलाखतीत सईने याबाबत खुलासा केला आहे.

फ्री प्रेस जर्नलच्या रिपोर्ट्सनुसार, सईला मराठी सिनेइंडस्ट्रीमधून बॉलिवूडमध्ये जाण्यामागचे कारण विचारण्यात आले. त्यावेळी ती म्हणाली की, तुमच्या कारकीर्दीत अशी वेळ येते जेव्हा तुम्हाला पुढे जाऊन वेगवेगळ्या गोष्टी अनुभवायच्या असतात. तसेच मलाही एक कलाकार म्हणून नवीन गोष्टींचा अनुभव घ्यायचा होता. हा नवीन अनुभव घेतल्यामुळे तुमच्या मनाला समाधान मिळते. मला प्रत्येक प्रोजेक्टसोबत नवीन टीमसोबत काम करायला आवडते. त्यामुळे मला खूप उभारी मिळते. याशिवाय हिंदी चित्रपटसृष्टीने मला स्वतःला पारखण्याची संधी दिली आणि या कारणामुळे मी हिंदी चित्रपटांकडे वळले आहे.

सई ताम्हणकरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर नुकतीच ती ‘मिमी’ या चित्रपटात महत्वाच्या भूमिकेत दिसली आहे. यात तिच्यासोबत पंकज त्रिपाठी, क्रिती सनॉन मुख्य भूमिकेत दिसले होते.

याशिवाय सई ताम्हणकर नवरसा या तमीळ सीरिजमध्ये देखील झळकली आहे. ती तमीळ अभिनेता विजय सेतुपथीसोबत दिसली. 

टॅग्स :सई ताम्हणकर