Join us

लेखकाच्या सन्मानार्थ वाचन यज्ञ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2016 15:46 IST

         प्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक-कलाकार प्रवीण तरडे यांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीनं साजरा करण्यात आला. महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी ...

         प्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक-कलाकार प्रवीण तरडे यांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीनं साजरा करण्यात आला. महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष अ‍ॅड. रमेश परदेशी यांनी आपला लहापणापासूनचा मित्र प्रवीण तरडे यांना वाढदिवसाच्या दिवशी एक अनोखे ‘सरप्राइज गिफ्ट’ दिले. प्रवीण एक उत्तम लेखक असल्यामुळे त्याच्या वाढदिवसाला परदेशी यांनी एक ‘वाचन यज्ञ’ सुरू केला ! 
शेतकरी कुटुंबातून आलेल्या प्रवीणला घडवलं ते केवळ पुस्तकांनी ! म्हणून शाळकरी मुलांनी, जिथे आयुष्याची पाया-भरणी होते - त्याच वयात खूप वाचलं पाहिजे या हेतूनं अ‍ॅड. रमेश परदेशी यांनी पुण्यातल्या मोरे विद्यालयात आणि पुणे महानगरपालिकेच्या पाच शाळांमध्ये, लेखक प्रवीण तरडे यांच्या हातून मुलांना ५०० प्रेरणादायी गोष्टींची पुस्तके वाटली.  प्रवीण तरडे यांनी तिथे आपल्या लहानपणाचा अनुभव कथन केला . प्रवीणला सुद्धा शाळेत असतांना असंच एक गोष्टीचं पुस्तक भेट मिळालं होतं आणि त्याच पुस्तकानं प्रवीणला आयुष्याची दिशा दाखवली. त्याला तेव्हा वाचनाची गोडी निर्माण झाली आणि मग तो वाचतच गेला. पुढे त्यानं अफाट वाचन केलं आणि त्यातूनच तो लेखन-दिग्दर्शक आणि कलाकार बनला !
रमेश परदेशी यांच्या मते, या उपक्रमामुळे मुलांमध्ये नक्कीच वाचनाची आवड निर्माण होईल आणि त्यांच्यातून अवांतर वाचनामुळे असेच प्रवीण घडत जातील . रमेश परदेशी यांचा हा उपक्रम तडीस नेण्यासाठी, शब्बीर शेख आणि साहित्य दरबारचे विनायक धारणे यांची मोलाची मदत झाली आहे. एक सूचक, बाकी वाचक या अभिनव संस्थेचे देखील सहकार्य लाभलं आहे.  या कार्यक्रमाला प्रा. के. एच. पाटील, अ‍ॅड. किशोर शिंदे, चंदूशेठ कदम आणि इतर मित्र परिवार उपस्थित होता.