Join us

रवीना टंडनने व्यक्त केली मराठी कॉमेडी सिनेमा करण्याची इच्छा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2017 13:35 IST

विविध हिंदी सिनेमात ग्लॅमरस भूमिका साकारत अभिनेत्री रवीना टंडन हिने रसिकांच्या काळजात अढळ स्थान मिळवलं आहे. तिची ग्लॅमरस अदा, ...

विविध हिंदी सिनेमात ग्लॅमरस भूमिका साकारत अभिनेत्री रवीना टंडन हिने रसिकांच्या काळजात अढळ स्थान मिळवलं आहे. तिची ग्लॅमरस अदा, विविध प्रकारच्या भूमिका, अभिनय आणि नृत्य कौशल्य यामुळे 'तू चीज बडी हैं मस्त मस्त' या रवीनाच्या गाजलेल्या मोहरा सिनेमातील गाण्याच्या ओळी आपसुकच रसिकांच्या ओठावर सहज रेंगाळतात. रुपेरी पडद्यावर साकारलेल्या भूमिकांमुळे रवीनाने चित्रपटसृष्टीत स्वतःचं वेगळं स्थान मिळवलं आहे. आजही विविध प्रकारच्या आव्हानात्मक भूमिका ती साकारत आहे. इतकंच नाही तर रुपेरी पडद्यासोबत छोट्या पडद्यावरही रवीनाची जादू पाहायला मिळते. विविध रियालिटी शोच्या जजच्या भूमिकेत रवीना पाहायला मिळतेय. मात्र आता मराठीतही कॉमेडी भूमिका साकारण्याची रवीनाची इच्छा आहे. लोकमत सीएनएक्सशी बोलताना रवीनाने आपली मनातली इच्छा व्यक्त केली आहे. मराठी सिनेमा रवीनासाठी काही नवा नाही. याआधीही तिने मराठी सिनेमात काम केलं आहे. मात्र अजूनही हा सिनेमा रिलीज झालेला नाही. 'भय' या सिनेमातही छोटीशी भूमिका रवीनाने साकारली होती. या सिनेमामुळेच रवीनाचा मराठीशी संबंध आला. मराठी भाषा अवगत नसली तरी मुंबईकर असल्याने ती समजते आणि बोलण्याचा प्रयत्न करत असल्याचे रवीनाने सांगितले. हिंदी सिनेमात कॉमेडी भूमिका साकारल्या आहेत. आता मराठीत एखादी कॉमेडी भूमिका साकारायला नक्की आवडेल असं रवीनाने सांगितले आहे. मराठीत चांगले आणि आशयघन सिनेमा येत असल्याबद्दलही रवीनाने कौतुक केले आहे. मात्र असे जास्त सिनेमा रसिकांना पाहायला मिळत नसल्याची खंतही रवीनाला वाटते. दुबईमध्ये एका सोहळ्यात रवीनाने लावणी नृत्य सादर केले होते. त्यावेळी आपला मराठमोळा अंदाज उपस्थितांना चांगला भावल्याची आठवणसुद्धा रवीनाने यावेळी सांगितली.