Join us

राणी वर्मा यांचा जश्न-ए-हुस्न लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2018 17:40 IST

तू सुखकर्ता तू दुःखहर्ता, पप्पा सांगा कुणाचे यांसारखी अनेक हिट गाणी गायलेल्या गायिका राणी वर्मा एका वेगळ्या अंदाजात प्रेक्षकांच्या ...

तू सुखकर्ता तू दुःखहर्ता, पप्पा सांगा कुणाचे यांसारखी अनेक हिट गाणी गायलेल्या गायिका राणी वर्मा एका वेगळ्या अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. त्यांचा एक कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून या कार्यक्रमासाठी त्या प्रचंड मेहनत घेत आहेत. राणी वर्मा यांनी आजवर अनेक चित्रपटांसाठी पार्श्वगायन केले आहे. तसेच त्यांचे अनेक अल्बमदेखील गाजले आहेत. आता आठ मार्चला जश्न-ए-हुस्न हा त्यांचा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. आठ मार्चला महिला दिनाच्या दिवशी हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीस आणण्याचे राणी वर्मा यांनी ठरवले आहे. या कार्यक्रमाद्वारे समस्त महिलांना आदरांजली वाहाण्यात येणार आहे. त्यामुळेच या कार्यक्रमाचा पहिला प्रयोग आठ मार्चला करण्यात येत आहे. जश्न-ए-हुस्न या कार्यक्रमाची संकल्पना ही राणी वर्मा यांचीच असून या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठीतील आघाडीची अभिनेत्री सोनाली कुलकर्णी करणार आहे. या कार्यक्रमाचे दिग्दर्शन सुदीप पडियार यांचे असून विश्वास नाटेकर यांनी या कार्यक्रमासाठी कोरिओग्राफी केली आहे. या कार्यक्रमात अनेक आघाडीचे गायक गाणार आहेत. श्लोक कुलकर्णी, श्रीरंग भावे, ज्योतिका शर्मा, अर्चना गोरे, मनिष आणि नवीन त्रिपाठी अशा या गायकांची नावे असून या कार्यक्रमासाठी राणी वर्मा सध्या जोरदार तयारी करत आहेत. या कार्यक्रमाच्या तालमी सध्या सुरू आहेत. जश्न-ए-हुस्न हा कार्यक्रम ८ मार्चला वांद्रे येथील रंगशारदा येथे संध्याकाळी होणार आहे. राणी वर्मा या प्रसिद्ध गायिका असून त्यांनी लहानपणापासूनच शास्त्रीय संगीताचे धडे गिरवले आहेत. राणी वर्मा या प्रसिद्ध गायिका माणिक वर्मा यांच्या बहीण आहेत. तसेच त्यांच्या बहिणी वंदना गुप्ते आणि भारती आचरेकर या प्रसिद्ध अभिनेत्री आहे. वंदना गुप्ते यांनी आजवर अनेक मराठी नाटक, चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांच्या भूमिकांना प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले आहे तर भारती आचरेकर यांनी मराठी चित्रपटसृष्टीप्रमाणेच हिंदी चित्रपटसृष्टीत देखील त्यांची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.