>> कोमल खांबे
छत्रपती शिवाजी महाराजांची शौर्यगाथा आणि धगधगता इतिहास 'राजा शिवाजी' सिनेमातून मोठ्या पडद्यावर दाखवण्यासाठी रितेश देशमुख सज्ज आहे. या सिनेमात रितेश स्वतःच छत्रपती शिवरायांची भूमिका साकारणार आहे, तर बॉलिवूडच्या कलाकारांची तगडी फौजही सिनेमात पाहायला मिळणार आहे. अभिनेता आणि दिग्दर्शक रामचंद्र गावकर याने देखील 'राजा शिवाजी'मध्ये महत्त्वाची भूमिका साकारली आहे. या सिनेमात रितेश देशमुखसोबत त्याचे काही ॲक्शन सीनही आहेत. या सिनेमाच्या निमित्ताने रामच्रंद गावकरने 'राजा शिवाजी'च्या शूटिंगचा अनुभव 'लोकमत फिल्मी'ला सांगितला.
'राजा शिवाजी' सिनेमात तुझं कास्टिंग कसं झालं?
'राजा शिवाजी' सिनेमाचं कास्टिंग हे रोहन म्हापूसकर यांनी केलं आहे. ते माझे खूप जवळचे मित्र आहेत. एक दिवस अचानक त्यांचा फोन आला आणि त्यांनी सिनेमात छोटी भूमिका आहे असं सांगितलं. 'राजा शिवाजी' सिनेमाबद्दल मी खूप आधीपासून ऐकून होतो. तेव्हापासून याबाबत खूप उत्सुकता होती. रितेश सरांनी स्वत: सिनेमा दिग्दर्शित केला आहे. मराठी आणि बॉलिवूडमधले मोठे कलाकार सिनेमात आहेत. त्यामुळे सिनेमाला नाही म्हणण्याचं काही कारणच नव्हतं. या भव्यदिव्य सिनेमाचा एक छोटा भाग होता येणं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे.
'राजा शिवाजी' सिनेमात रितेश सरांसोबत स्क्रीन शेअर केली आहेस, तो अनुभव कसा होता?
रितेश सरांसोबत मी या सिनेमात ॲक्शन सीक्वेन्स करताना दिसणार आहे. त्या सीक्वेन्सचं शूटिंग जवळपास ७ दिवस सुरू होतं. या सीक्वेन्ससाठी परदेशातून ॲक्शन टीम बोलवण्यात आली होती. त्यामुळे खूप वेगळ्या पद्धतीने ते ॲक्शन सीन शूट केले गेले आहेत. महाराजांचा सिनेमा असल्यामुळे परदेशातून आलेल्या या ॲक्शन टीमलाही अत्यंत योग्य प्रकारे माहिती दिली गेली होती. रितेश सरांनी ज्या पद्धतीने हा सिनेमा घडवला आहे, त्याची भव्यताही यातून दिसून येते. त्यांच्यासोबत काम केलेल्या ७ दिवसांत एक गोष्ट जाणवली की 'राजा शिवाजी' सिनेमातील प्रत्येक छोट्या भूमिकेचा रितेश सरांचा अभ्यास एकदम पक्का होता. जेव्हा एवढे मोठे आर्टिस्ट तुमच्यासमोर असतात, तेव्हा त्यांच्यासोबत काम करणं हे नक्कीच आव्हानात्मक असतं. पण, 'राजा शिवाजी' सिनेमाच्या सेटवरील वातावरण असं होतं की काम करताना दडपण आलं नाही.
सिनेमात तू कोणतं पात्र साकारताना दिसणार आहेस?
'राजा शिवाजी' सिनेमात मी रंगोत्री हे पात्र साकारत आहे. ट्रेलरमध्ये तुम्ही पाहिलंच असेल की महाराज मला शिक्षा देतात. तर शिक्षा देण्यासारखाच काहीतरी मोठा गुन्हा मी केलेला आहे. बाकी तुम्हाला सिनेमात पाहायला मिळेलच.
पहिल्यांदा रितेश सरांना छत्रपती शिवाजी महारांजाच्या लूकमध्ये पाहून काय वाटलं?
खरं सांगायचं तर माझ्या अंगावर काटा आला होता. आपण प्रत्यक्षात कुणीच महाराजांना बघितलेलं नाही. आपण वेगवेगळ्या सिनेमांच्या माध्यमातून, पुस्तकातून महाराज अनुभवले आहेत. आमचा ॲक्शन सीक्वेन्स शूट करताना जेव्हा महाराज म्हणून रितेश सर समोर उभे राहिले तेव्हा सगळे संमोहित झाले. वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी सिनेमात शिवाजी महाराज साकारले आहेत. त्यामुळे ते खूप नैसर्गिक आणि आपलंसं वाटतं. त्या भावना फार वेगळ्या होत्या.
या सिनेमामुळे मराठी इंडस्ट्रीत काय बदल होईल असं वाटतं?
'राजा शिवाजी' हा मराठीतील ऐतिहासिक सिनेमा ठरणार आहे. इतक्या मोठ्या स्केलवर मराठीत सिनेमे सतत होत नसतात. 'राजा शिवाजी' हा सिनेमा नाही तर महाराष्ट्रासाठी एक उत्सव आहे. हा उत्सव सगळे जण मिळून साजरा करतील. या सिनेमामुळे मराठी इंडस्ट्रीत फरक पडला आहे, हे एक नवोदित लेखक-दिग्दर्शक असल्यामुळे मी नक्कीच सांगू शकतो. 'राजा शिवाजी' सारखे भव्यदिव्य सिनेमे मराठी इंडस्ट्रीत होऊ शकतात, हा विचार आता बाकी इंडस्ट्रीतील लोकही करू लागले आहेत. मराठीत खूप चांगले दिग्दर्शक, लेखक आहेत. आपल्याकडे इतकं साहित्य आहे. या सिनेमानंतर मराठी इंडस्ट्रीत नवं पर्व सुरू होईल.
'राजा शिवाजी' सिनेमा वेगळा का आहे?
सगळ्यांनीच महाराजांवर आपापल्या परीने उत्तम सिनेमे केले. प्रेक्षकांनीही या सर्वच सिनेमांना चांगला प्रतिसाद दिला. आत्तापर्यंत जे सिनेमे झाले त्यापेक्षा 'राजा शिवाजी' सिनेमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाच्या आणखी जवळ जाण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. इतकी वर्षं या सिनेमासाठी इतकी माणसं काम करत होती. त्यांच्या पॅशनसाठी हा सिनेमा वेगळा आहे. संतोष शिवन मराठी सिनेमा शूट करत आहेत, हे पहिल्यांदाच घडत आहे.
रितेश सरांबाबत एक भावलेली गोष्ट कोणती?
रितेश सर प्रत्येकाशी आदराने बोलतात आणि तसंच वागवतात. मी अभिनेता असण्यासोबत एक दिग्दर्शकही आहे. माझ्या सिनेमाचं शूटिंगही तेव्हा सुरू होतं. जेव्हा मी रितेश सरांना पहिल्यांदा भेटलो तेव्हा त्यांनी त्याबद्दलही खूप आपुलकीने विचारपूस केली. एवढा मोठा अभिनेता आणि दिग्दर्शक माझ्यासारख्या नवोदित दिग्दर्शकाला त्याच्या सिनेमाबद्दल विचारतो, हे मी कधीच विसरू शकत नाही. माझ्यासाठी ते अविस्मरणीय आहे.
पुढची कोणती कलाकृती प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहेस?
मी दिग्दर्शित केलेला एक सिनेमा याच वर्षी प्रदर्शित होत आहे. लवकरच त्याबाबत अनाऊंसमेंट केली जाईल. एक तरुण दिग्दर्शक म्हणून माझी जी सिनेमा सांगण्याची भाषा आहे, त्याप्रकारे मी सिनेमा बनवला आहे. कुटुंबाला कनेक्ट करणारी, संस्कृती परंपरा दाखवणारी अशी सिनेमाची कथा आहे.
Web Summary : Ramchandra Gavkar shares his experience working with Riteish Deshmukh in 'Raja Shivaji'. He plays Rangotri and filmed action sequences with a foreign team. Gavkar praises Deshmukh's dedication and the film's grand scale, anticipating a new era for Marathi cinema.
Web Summary : रामचंद्र गावकर ने 'राजा शिवाजी' में रितेश देशमुख के साथ काम करने का अनुभव साझा किया। वह रंगोत्री की भूमिका निभा रहे हैं और उन्होंने विदेशी टीम के साथ एक्शन सीक्वेंस फिल्माए। गावकर ने देशमुख के समर्पण और फिल्म के भव्य पैमाने की प्रशंसा की, और मराठी सिनेमा के लिए एक नए युग की उम्मीद जताई।