पुष्कर श्रोती, अतुल परचुरे, अजित परब आणि आनंद इंगळे यांचे नवे नाटक आम्ही आणि आमचे बाप
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2017 14:14 IST
सुरक्षित अंतर ठेवा आणि हसवा फसवी अशी पुष्कर श्रोतीची दोन नाटकं सध्या प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. हसवा फसवी या ...
पुष्कर श्रोती, अतुल परचुरे, अजित परब आणि आनंद इंगळे यांचे नवे नाटक आम्ही आणि आमचे बाप
सुरक्षित अंतर ठेवा आणि हसवा फसवी अशी पुष्कर श्रोतीची दोन नाटकं सध्या प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. हसवा फसवी या नाटकातील पुष्करच्या भूमिकेचे तर नेहमीच कौतुक केले जाते तर सुरक्षित अंतर ठेवा हे नाटक सध्या अनेक पुरस्कार सोहळ्यात गाजत आहे. पुष्करचा रंगभूमीवरील वावर हा पाहाण्यासारखा असतो. त्याच्या फॅन्ससाठी एक खूपच चांगली बातमी आहे. आता पुष्करचे एक नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या नाटकाचे नाव आम्ही आणि आमचे बाप असे असून या नाटकाचा पहिला प्रयोग 15 जुलैला बोरीवलीमधील प्रबोधनकार ठाकरे येथे होणार आहे. आम्ही आणि आमचे बाप या नाटकात एकापेक्षा एक दिग्गज कलाकार प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. अतुल परचुरेने नातीगोती, तरुण तुर्क म्हातारे अर्क यांसारख्या नाटकांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. केवळ मराठी चित्रपटसृष्टीमध्येच नव्हे तर हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये देखील त्याने आपल्या अभिनयाने आपला ठसा निर्माण केला आहे. आर के लक्ष्मण की दुनिया, यम है हम यांसारखे त्याचे अनेक हिंदी कार्यक्रम गाजले आहेत. आता तो आम्ही आणि आमचे बाप या नाटकात दिसणार आहे. यासोबतच अजित परब, आनंद इंगळे या नाटकात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. हे चार कलाकार एकाच नाटकात एकत्र आल्यामुळे हे नाटक मजेशीर असणार यात काही शंकाच नाही. या नाटकाचे दिग्दर्शन आदित्य इंगळे करणार आहे. पु.ल देशपांडे आणि आचार्य अत्रे यांच्या निवडक कलाकृतींवर आधारित हे नाटक असणार आहे. या नाटकाचे नेपथ्य आणि वेशभूषा राजन भिसे यांचे आहे तर या नाटकाची निर्मिती मयुर रानडे, दिलीप जाधव आणि श्रीपाद पद्माकर यांनी केली आहे. Also Read : अतुल परचुरे आता झळकणार या मालिकेत