Join us

आशय प्रधान मराठी सिनेमा 'ध्यानीमनी'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2017 10:42 IST

गीतांजली आंब्रे चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित आणि महेश मांजरेकर निर्मित ध्यानीमनी हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. ध्यानमनी चित्रपटात आशयाला ...

गीतांजली आंब्रे चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित आणि महेश मांजरेकर निर्मित ध्यानीमनी हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. ध्यानमनी चित्रपटात आशयाला जास्त महत्त्व देण्यात आले आहे. सायकोलॉजिकल थ्रिलर असलेला हा चित्रपट ध्यानीमनी या नाटकावर आधारित आहे. याचनिमित्ताने लोकमत सीएनएक्सच्या ऑफिसमध्ये महेश मांजरेकर, चंद्रकांत कुलकर्णी, अश्विनी भावे आणि लेखक प्रशांत दळवी अशी ध्यानमनीची संपूर्ण टीम आली होती त्यांच्याशी मारलेल्या गप्पांचा हा सारांश.   
 
ध्नानीमनी हा चित्रपट 1993-94 साली रंगभूमीवर सादर झालेल्या ध्यानीमनी नाटकावर आधारित आहे. या नाटकाचे दिग्दर्शन चंद्रकांत कुलकर्णी यांनी केले होते तर महेश मांजरेकर यांनी त्यात अभिनय केला होता आणि प्रशांत दळवी यांनी या नाटकाचे लेखन केले होते. नाटकाची ही टीम चित्रपटातही कायम आहे. नाटकाचीच गोष्ट चित्रपटात कायम ठेवण्यात आली आहे मात्र कथानकाची मांडणी आम्ही चित्रपटाच्या अंगाने केली असल्याचे दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी यावेळी सांगितले. ध्यानीमनी या नाटकातल्या भावनांमध्ये वैश्विकता आहे त्याला कोणत्याही देशाचे, काळाचे बंधन नाही असे हळूहळू जाणवायला लागले आणि म्हणून या नाटकाचे चित्रपटात रूपांतर करण्याचे धाडस आम्ही केले असल्याचे लेखक प्रशांत दळवी यांनी सांगितले. हा चित्रपट बघण्यापेक्षा जास्त ऐकण्याचा आहे असे महेश मांजरेकर सांगतात. महेश मांजरेकर, चंद्रकांत कुलकर्णी आणि प्रशांत दळवी हे तिघेही नाटकात होते मात्र अश्विनी भावे या नाटकाचा भाग नव्हत्या. त्यामुळे चित्रपटात काम करतानाच्या त्यांच्या अनुभवाबद्दल त्यांच्याकडून आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्या म्हणाल्या, मी प्रशांतच्या लिखाणाच्या प्रेमात आहे. खूप कमी भूमिका असतात ज्या संपूर्णपणे डेव्हलप केलेल्या असतात किंवा ज्यांचे वर्तुळ पूर्ण झालेले असते. या चित्रपटात माझी आणि महेश मांजरेकर यांची भूमिका काहीशी वर्तुळ पूर्ण करणारी आहे. त्यामुळे काम करताना जेवढे सोपे होते तेवढेच कठीण होते. शालू पाठकची भूमिका मला खूप आव्हानात्मक वाटली. चंद्रकांत कुलकर्णी महेश मांजरेकर, प्रशांत दऴवी हे तिघेही हे नाटक जगले आहेत. त्यामुळे  माझ्याकडून ते ही भूमिका योग्यरितीने करून घेतील याची मला खात्री होती. मीदेखील स्वत:ला शालू पाठकच्या भूमिकेत झोकून देऊन काम केले आहे.'' 
ध्यानमनीच्या निमित्ताने मराठी चित्रपटसृष्टीत एका नवा प्रयोग करण्यात आला आहे. हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधी तो पत्रकार आणि समीक्षकांना न दाखवता विविध क्षेत्रातील मान्यवरांना दाखवण्यात आला. यातील अनेकांचा चित्रपटक्षेत्राशी काहीही संबंध नव्हता. त्यांच्याकडून चित्रपटाविषयीच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यात आल्या.सिनेमा बघताना आम्ही नाटक विसरलो अशा पद्धतीच्या काही बोलक्या प्रतिक्रिया आम्हाला मिळाल्याचे दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी सांगितले. तर अमराठी लोकांनादेखील हा सिनेमा भावल्याची पावती मिळाल्याचे महेश मांजरेकर यांनी सांगितले. या चित्रपटाची पब्लिसिटी 'चित्रपट पाहू नका' अशा नकारात्मक अंगाने करण्यात आली होती. याबाबत विचारण्यात आले असता महेश मांजरेकर म्हणाले, ''हल्ली एखाद्या चित्रपटाबाबत कॉन्ट्रोव्हर्सी निर्माण झाली की तो चित्रपट जास्त पाहिला जातो, हीच गोष्ट लक्षात घेऊन आम्ही हा चित्रपट बघू नका ही टॅगलाइन घेतली''. या टॅगलाइनमुळे प्रेक्षकांची चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढेल असे आम्हाला वाटल्याचे चित्रपटाचे दिग्दर्शक सांगतात. 
ध्यानमनी चित्रटातामुळे मराठीतील इतर दिग्दर्शकही वेगळे काही तरी करण्याचे धाडस करतील आणि ध्यानीमनीसारख्या दर्जेदार कलाकृती मराठी चित्रपटसृष्टीत तयार होतील अशी आशा करण्यास हरकत नाही.