‘बबन’ सिनेमावरचे ‘मेकिंग ऑफ बबन’ पुस्तक प्रकाशित
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2018 18:52 IST
आतापर्यंत अनेक गाजलेल्या पुस्तकांवर चित्रपट बनवले गेले आहेत. मात्र एका चित्रपटावर पुस्तक काढण्याची ही पहिलीच वेळ आहे! द फोक ...
‘बबन’ सिनेमावरचे ‘मेकिंग ऑफ बबन’ पुस्तक प्रकाशित
आतापर्यंत अनेक गाजलेल्या पुस्तकांवर चित्रपट बनवले गेले आहेत. मात्र एका चित्रपटावर पुस्तक काढण्याची ही पहिलीच वेळ आहे! द फोक कोनफ्लूअन्स इंटरटेंटमेंट प्रस्तुत व चित्राक्ष फिल्म्स निर्मित ‘बबन’ या सिनेमाच्या जडणघडणीचा अखंड लेखाजोखा मांडणारे ‘मेकिंग ऑफ बबन’ हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे. पत्रकार मंदार जोशी संपादित (तारांगण प्रकाशन) या पुस्तकाचा पुणे येथील नॅशनल फिल्म अर्काईव्हमध्ये समर नखाते यांच्या हस्ते प्रकाशन सोहळा पार पडला होता. ‘बबन’ या सिनेमाची संपूर्ण घडण या पुस्तकामध्ये मांडण्यात आली आहे. ‘मेकिंग ऑफ बबन’ या पुस्तकात 'बबन' सिनेमातील सर्व कलाकार मंडळींचे अनुभव आणि त्यांचे निवेदन मांडण्यात आले आहे. एका ग्रामीण तरुणाच्या भावविश्वावर आधारित असलेल्या या सिनेमाची कथा सर्वसामान्य प्रेक्षकांना आपलीशी करणारी आहे. या सिनेमाची विठ्ठलराव कऱ्हाडे, प्रमोद भास्कर चौधरी, मोनाली संदीप फंड आणि भाऊसाहेब शिंदे यांनी निर्मिती केली असून बबन आणि कोमलच्या रोमांचक प्रेमकथेचा आस्वाद प्रेक्षकांना यामार्फत चाखता येणार आहे.बबन या सिनेमाचे राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त चित्रपट 'ख्वाडा'चे दिग्दर्शक भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे यांनी लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. आतापर्यंत ग्रामीण जीवनावर भाष्य करणारे अनेक सिनेमे येऊन गेले आहेत, मात्र भाऊरावांच्या दिग्दर्शकीय कौशल्यातून साकार झालेल्या 'बबन'मध्ये प्रेक्षकांना ग्रामीण जीवनाचा प्रत्यक्ष अनुभव घेता येत आहे. सामान्य ग्रामीण तरुणाची सामान्य कथा दाखवणारा 'बबन' मध्यमवर्गीय प्रेक्षकांना आपलासा करत आहे. 'ख्वाडा' सिनेमाद्वारे नावारूपास आलेला रांगडा अभिनेता भाऊसाहेब शिंदेची 'बबन' मध्ये प्रमुख भूमिका असून यात तो एका वेगळ्याच भूमिकेतून लोकांसमोर आला आहे. 'ख्वाडा'मध्ये लाजरा, मितभाषी आणि स्वप्नाळू दाखवलेला भाऊराव, 'बबन' सिनेमात रोमान्स तसेच फायटिंग करताना दिसत आहे. त्यासोबत गायत्री जाधव या नव्या चेहऱ्याने सुद्धा या सिनेमातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले आहे. गायत्रीने यात 'कोमल' नावाची भूमिका साकारली असून या दोघांची भूमिका आणि हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. Also Read : ख्वाडा फेम भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे सांगतायेत, ख्वाडानंतर मी झालो होतो ब्लँक