प्रियांका चोप्रा आणि राजेश म्हापूसकर पुन्हा येणार एकत्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2017 19:55 IST
प्रियांका चोप्रा आणि राजेश म्हापूसकर यांच्या व्हेंटिलेटर या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती. केवळ समीक्षकच नव्हे तर ...
प्रियांका चोप्रा आणि राजेश म्हापूसकर पुन्हा येणार एकत्र
प्रियांका चोप्रा आणि राजेश म्हापूसकर यांच्या व्हेंटिलेटर या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती. केवळ समीक्षकच नव्हे तर प्रेक्षकांनीदेखील या चित्रपटाचे कौतुक केले होते. या चित्रपटात आशुतोष गोवारिकर, जितेंद्र जोशी यांच्या प्रमुख भूमिका होत्या तर या चित्रपटातील मराठीतील अनेक दिग्गज कलाकार प्रेक्षकांना पाहायला मिळाले होते. या चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन हे दोन्ही राजेश म्हापूसकर यांचे होते. तर या चित्रपटाची निर्मिती प्रियांका चोप्राने केली होती. राजेश आणि प्रियांकाच्या या पहिल्याच चित्रपटाला प्रचंड यश मिळाले. या चित्रपटाला अनेक पुरस्कार मिळाले आहेत आणि त्याचसोबत या चित्रपटाला तीन राष्ट्रीय पुरस्कारदेखील जाहीर झाले आहेत. आता या चित्रपटाच्या यशानंतर राजेश आणि प्रियांकाच्या जोडीचा आणखी एक चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. याविषयी स्वतः राजेश म्हापूसकर यांनी नुकतेच सांगितले आहे. त्यांनी एका वर्तमानपत्राशी बोलताना सांगितले आहे की, ते सध्या एका हिंदी चित्रपटावर काम करत असून या चित्रपटाचे चित्रीकरण झाल्यानंतर ते प्रियांकाच्या प्रोडक्शन हाऊससाठी एक मराठी चित्रपट दिग्दर्शित करणार आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना व्हेंटिलेटर इतका दर्जेदार मराठी चित्रपट पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे.व्हेंटिलेटर या चित्रपटाच्या यशानंतर प्रियांकाचे प्रोडक्शन हाऊस सध्या एका मराठी चित्रपटावर काम करत आहे. काय रे रास्कला असे या चित्रपटाचे नाव असून या चित्रपटात मराठीतील अनेक प्रसिद्ध कलाकार प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. त्यासोबतच प्रियांकाच्या प्रोडक्शन हाऊसतर्फे पंजाबी, भोजपुरी, कोकणी, सिक्कीम या भाषातील चित्रपटांचीदेखील निर्मिती केली जाणार आहे.