प्रिया बापट (Priya Bapat) आणि उमेश कामत (Umesh Kamat ) मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडपं आहेत. त्यांची ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावते. दरम्यान आता दोघे लवकरच एकत्र रुपेरी पडद्यावर झळकणार आहेत. या सिनेमाचं नाव आहे 'बिन लग्नाची गोष्ट' (Bin Lagnachi Goshta Movie). या सिनेमाच्या निमित्ताने ते अनेक ठिकाणी मुलाखती देत आहेत. एका ऑनलाइन पोर्टलने त्यांना रॅपिड फायरमध्ये दोघांनी एकमेकांचे नंबर काय नावाने सेव्ह केले आहेत. असे विचारले असता त्यांनी एकमेकांची मजेशीर नावं सांगितली.
प्रिया बापट आणि उमेश कामत सध्या त्यांचा आगामी सिनेमा 'बिन लग्नाची गोष्ट'चं प्रमोशन करत आहेत. त्यासाठी ते बऱ्याच ठिकाणी मुलाखती देताना दिसत आहेत. लोकसत्ताच्या रॅपिड फायरमध्ये त्यांनी अनेक प्रश्नांची मजेशीर उत्तरं दिली. त्यात प्रिया आणि उमेशला एकमेकांच्या नावडत्या गोष्टींबद्दल विचारण्यात आले. त्यावर उमेश म्हणाला की, ''प्रिया माझ्यासारखी छान झोपू शकत नाही, आळशीपणा चांगला करु शकत नाही. माझ्यासारखी सायकलिंग नाही करू शकत.'' तर प्रिया म्हणाली की, ''उमेशच्या बऱ्याच गोष्टी आहेत. पण शिस्तीत राहणं, वागणं आणि ओटा आवरणं या गोष्टी आहेत.''
त्याचवेळी त्यांना त्यांनी मोबाइलमध्ये एकमेकांचे नंबर काय नावाने सेव्ह केलेत, असे विचारण्यात आले. त्यावर उमेश म्हणाला की, ''सीक्रेट ठेवलं होतं सगळं. बंड्या'' आणि प्रिया म्हणाली ''कुकू'' या नावाने सेव्ह केले आहे. भांडणानंतर ते दोघे एकमेकांचे राग घालवण्यासाठी काय करतात, असे विचारण्यात आले. त्यावर प्रिया हसली आणि म्हणाली की, ''करत नाही. करायला पाहिजे. त्याच्याशी दोन-तीन दिवस बोलायला जायचं नाही. त्याला तसंच सोडून द्यायचं.'' तर उमेश म्हणाला की, ''करत नाही करायला पाहिजे. ताबोडताब सॉरी म्हणायचं आणि जवळ घ्यायचं. कम्युनिकेशन लगेच व्हायला पाहिजे. पण ते करायला पाहिजे.''
'बिन लग्नाची गोष्ट' सिनेमाबद्दलनात्यांचा गुंता, प्रेमाची गोडी आणि थोडीशी नोकझोक… हे सगळं सांगणारी 'बिन लग्नाची गोष्ट' ही गोड कथा आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गॉडगिफ्ट एंटरटेनमेंट प्रा. लि. आणि एस. एन. प्रॉडक्शन्स निर्मित हा सिनेमा १२ सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. प्रिया बापट, उमेश कामत, निवेदिता सराफ, गिरीश ओक, सुकन्या मोने आणि संजय मोने यांच्या दमदार अभिनयाने सजलेला हा चित्रपट प्रेक्षकांसाठी नात्यांची नवी सफर ठरणार आहे.