प्रिया बापट (Priya Bapat) आणि उमेश कामत (Umesh Kamat ) मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडपं आहेत. त्यांची ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावते. ही जोडी नेहमीच नवनवीन कपल्स गोल सेट करत असते. लग्नाला इतकी वर्ष होऊनही प्रिया आणि उमेशला मुल नाही. त्यामुळं बाळाचं प्लॅनिंग करणार की नाही, असा प्रश्न त्यांना अनेक वेळा विचारला जातो, आता अलिकडेच प्रियानं बेबी बंपवर हात ठेवल्याचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. या फोटोंच्या कॅप्शनमध्ये प्रियानं हे फोटो सिनेमातील असल्याचं स्पष्ट लिहलं होतं. तरीही त्यानंतर तिला अनेकांनी ती प्रेग्नंट आहे का असा प्रश्न केला. आता प्रियानं असाच एक प्रश्न करणाऱ्या चाहतीला उत्तर दिलंय.
प्रिया बापट हिने नुकतेच तिच्या इन्स्टाग्रामवर 'आस्क मी सेशन' घेतले. यावेळी एका चाहतीने तिला थेट विचारले की, "तू खरंच प्रेग्नंट आहेस की चित्रपटातील सीन आहे?" हा प्रश्न ऐकून प्रिया आणि तिच्यासोबत असलेल्या निवेदिता सराफ दोघीही हसू लागल्या. यावर निवेदिता यांनी उत्तर दिले, "नाही! नाही!". तसेच तो फोटो एका चित्रपटातील असल्याचे स्पष्ट केले. प्रियाने पुढे म्हटले, "मला निवेदिता ताईंबरोबर पहिल्यांदाच काम करण्याची संधी मिळाली आहे. मी तुम्हाला जशी छान, गुटगुटीत गरोदर मुलगी दिसतेय, त्याचं कारण काय आहे? निवेदिता ताई, तुम्हीच सांगा".
यावर निवेदिता सराफ म्हणतात, "याचं कारण आता तुम्ही १२ सप्टेंबरला थिएटरमध्ये येऊन बघा. तुम्हाला कळेल की, प्रियाने खूप उत्तम काम केलं आहे. आताही तिचं काम पाहून तुम्हाला ती खरंच प्रेग्नंट आहे असं वाटतंय. त्यामुळे सिनेमा नक्की पाहा". दरम्यान, प्रिया बापट आणि उमेश कामत ही लोकप्रिय जोडी तब्बल १२ वर्षांनंतर 'बिन लग्नाची गोष्ट' या चित्रपटातून पुन्हा एकत्र आले आहेत. आदित्य इंगळे दिग्दर्शित या सिनेमात निवेदिता सराफ, गिरीश ओक, सुकन्या मोने, संजय मोने असे अनेक लोकप्रिय कलाकार आहेत. हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.