Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रसाद फाटक यांचे हिंदी गाणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2017 17:24 IST

शालेय जीवनात वादक आणि नंतर गायक म्हणून सांगीतिक प्रवासाची सुरुवात करत प्रसाद फाटक यांनी गझल, सुगम संगीत, नाट्यसंगीत आणि ...

शालेय जीवनात वादक आणि नंतर गायक म्हणून सांगीतिक प्रवासाची सुरुवात करत प्रसाद फाटक यांनी गझल, सुगम संगीत, नाट्यसंगीत आणि अभंग अशा विविध संगीत प्रकारच्या सक्षम सादरीकरणातून रसिकांची दाद मिळवली. त्यांनी आतापर्यंत अनेक हिंदी आणि मराठी गाण्यांचे संगीत दिग्दर्शन केले आहे. हिंदुस्तानी शास्त्रीय गायनाचे विशेष प्रेम असणाऱ्या प्रसाद फाटक यांनी २००३ साली आपला पहिला मराठी अल्बम सांजवेळी सोबतीला प्रकाशित करून आपल्या दिग्दर्शनाच्या कारकिर्दीची सुरुवात केली.  त्यानंतर द्रौपदी से दामिनी या सिंगल म्युजिक अल्बमचे संगीत दिग्दर्शन आणि निर्मिती केली. त्यांची अनेक गाणी सामाजिक आणि वास्तविक जीवनावर मार्मिक भाष्य करणारी असतात. या गाण्यांसाठी त्यांना आतापर्यंत अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत. जनजागृतीपर संदेश देणाऱ्या गाण्यांचे दिग्दर्शन करण्यासोबतच प्रसाद फाटक यांनी काही व्यावसायिक गाणी देखील दिग्दर्शित केली आहेत. एका आगामी मराठी चित्रपटाकरता त्यांनी रोमँटिक डयुएट गाणे दिले असून ते लवकरच प्रेक्षकांसमोर येणार आहे. तसेच प्रसाद फाटक दिग्दर्शित हिंदीतील एक रोमँटिक गाणे देखील लवकरच रसिकांच्या भेटीला येणार आहे. समीर सामंत यांनी शब्दबद्ध केलेल्या या गाण्याला गायिका अन्वेशाने स्वरसाज चढवला असून सैनिकाच्या पत्नीला आपला पती अनेक दिवसांनी घरी येणार म्हणून झालेला आनंद आणि त्याच्या येण्याच्या एक दिवस आधीच मिळालेल्या युद्धाच्या बातमीने होणारी मनाची तगमग मांडणारे हे गाणे आहे. हे गाणे सैनिक व त्यांच्या कुटुंबाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणारा ठरेल आणि ते सर्वांना आवडेल, अशी आशा प्रसाद फाटक व्यक्त करतात.