प्रसाद ओकच्या हिरकणी या चित्रपटाच्या चित्रीकरणाला होणार लवकरच सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2017 14:49 IST
प्रसाद ओक आणि चिन्मय मांडलेकरच्या जोडीने आतापर्यंत अनेक हिट चित्रपट दिले आहे. चिन्मयची कथा असलेला आणि प्रसादचे दिग्दर्शन असलेल्या ...
प्रसाद ओकच्या हिरकणी या चित्रपटाच्या चित्रीकरणाला होणार लवकरच सुरुवात
प्रसाद ओक आणि चिन्मय मांडलेकरच्या जोडीने आतापर्यंत अनेक हिट चित्रपट दिले आहे. चिन्मयची कथा असलेला आणि प्रसादचे दिग्दर्शन असलेल्या कच्चा लिंबू या चित्रपटाचे चित्रीकरण झाले असून या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटानंतर प्रसाद आणि चिन्मय हिरकणी या चित्रपटाची तयारी करत आहेत. या चित्रपटाची पटकथा चिन्मयने लिहिली असून दिग्दर्शन प्रसाद करणार आहे. हिरकणी या चित्रपटात प्रेक्षकांना एक खरी खुरी कथा पाहायला मिळणार आहे. इतिहासातील हिरकणीची गोष्ट मातृत्वाच्या महानतेसाठी नेहमी सांगितली जाते. आई या शब्दांचे सामर्थ्य सांगणारी ही कथा आधुनिक स्त्रीच्या जीवनाशी अगदी मिळती-जुळतीच म्हणावी लागेल. मराठा साम्राज्याची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्यावरचा एक अवघड बुरुज काळ्याभिन्न अंधारात, आपल्या तान्ह्या बाळासाठी उतरून येणाऱ्या या आईचे साहस इतिहासात सुवर्ण अक्षरात कोरले गेले आहे. मातृत्वाच्या याच धाडसाची गाथा प्रेक्षकांना हिरकणी या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाची घोषणा प्रसादने महिला दिनाचे निमित्त साधून केली होती. तेव्हापासूनच हिरकणी ही मुख्य भूमिका कोण साकारणार याची सगळ्यांना उत्सुकता लागली आहे. हिरकणीच्या भूमिकेत कोणती नायिका असणार आहे, हे अद्याप तरी गुलदस्त्यातच ठेवणे चित्रपटाच्या टीमने पसंत केले होते. पण आता या चित्रपटाचे लवकरात लवकर चित्रीकरण सुरू होणार असल्याचे कळतेय. प्रसाद या चित्रपटासाठी जोरदार मेहनत घेत आहे. या चित्रपटाची कथा लेखक प्रताप गंगावणे यांनी लिहिली असून चिन्मय मांडलेकरने या चित्रपटाची पटकथा आणि संवाद लिहिले आहेत.