Join us
Daily Top 2Weekly Top 5

"आज दोन महिने झाले माझ्या बाबांना जाऊन..." वडिलांच्या आठवणीत प्रार्थना भावुक, उद्या करणार महत्त्वाची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2025 16:31 IST

प्रार्थनानं वडिलांच्या आठवणीत हा व्हिडीओ तयार केला आहे. यात तिने तिच्या सध्याच्या मनःस्थितीबद्दल आणि तिच्या आगामी कामाबद्दल चाहत्यांशी संवाद साधला आहे.

लोकप्रिय अभिनेत्री प्रार्थना बेहेरेच्या वडिलांचं १४ ऑक्टोबर २०२५ रोजी एका रस्ते अपघातात निधन झालं. वयाच्या ७५ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अभिनेत्री प्रार्थना बेहेरेने स्वत याबाबत पोस्ट शेअर करत माहिती दिली होती. आता वडिलांच्या निधनानंतर दोन महिन्यांनी प्रार्थनानं सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. 

प्रार्थनानं वडिलांच्या आठवणीत हा व्हिडीओ तयार केला आहे. यात तिने तिच्या सध्याच्या मनःस्थितीबद्दल आणि तिच्या आगामी कामाबद्दल चाहत्यांशी संवाद साधला आहे.  ती म्हणाली, "नमस्कार सर्वांना... आज हा व्हिडीओ करण्याचं कारण हे आहे की आज १४ तारीख आहे. आज दोन महिने झाले माझ्या बाबांना जाऊन आणि बाबांसाठी हा व्हिडीओ करतेय. खरंतर, मला काहीच सुचत नाहीये. मी आजवर कधीच तुमच्यासमोर अशाप्रकारे व्यक्त झालेले नाही. मी आता कोणत्या मनस्थितीत आहे हे तुम्हाला सर्वांना समजलंय, बऱ्याच जणांचे  मेसेज मी वाचलेत. हे दु:ख आहे आणि आता कायम राहणार... ते मी शब्दात व्यक्त सुद्धा करू शकणार नाही". 

प्रार्थना पुढे म्हणाली, "माझे बाबा नेहमी मला म्हणायचे की आयुष्यात नेहमी खूश राहा. आनंदी राहायचा प्रयत्न कर. तू एक अभिनेत्री आहेस. सगळ्यांचं मनोरंजन करायचं हे तुझं काम आहे…कायम तू छान काम कर. ते असताना मी जे काम केलं होतं… ते काम आता बाबा नसताना तुमच्या भेटीला येणार आहे. बाबांचे आशीर्वाद कायम असणार आहेत. पण, मला तुमचेही आशीर्वाद हवे आहेत. बाबा मला नेहमी म्हणायचे… मी तुझा खूप मोठा फॅन आहे. आता बाबा तर नाहीयेत. पण, मला माहितीये तुम्ही सगळे माझ्याबरोबर आहात". 

सोमवारी १५ डिसेंबर रोजी म्हणजे उद्या नव्या प्रोजेक्टची घोषणा करणार असल्याचं प्रार्थनानं सांगितलं. ती म्हणाली, "मी उद्या काहीतरी स्पेशल घेऊन येतेय... जे खरंतर माझ्या बाबांसाठी आहे. तुम्हा सगळ्यांसाठी आहे. यासाठी मला तुम्हा सर्वांचा पाठिंबा हवाय. तुमचा आशीर्वाद हवाय. बाबा असताना त्यांनी माझं हे काम आधीच पाहिलं होतं. आता बाबा नसताना हे काम प्रदर्शित होणार आहे. आता तुमचा पाठिंबा हवा आहे. तो पाठिंबा कायम ठेवा... धन्यवाद!" या शब्दात तिनं आपल्या भावना व्यक्त केल्या. प्रार्थनाच्या पोस्टवर मराठी कलाकारांसह तिच्या चाहत्यांनी कमेंट करत तिचं सांत्वन केलं.

English
हिंदी सारांश
Web Title : Prarthana Behere Remembers Father, Announces Project Two Months After Passing

Web Summary : Actress Prarthana Behere shares a heartfelt video two months after her father's passing in a road accident. Remembering him, she announced a special project dedicated to him, seeking blessings and support for its release.
टॅग्स :प्रार्थना बेहरे