Join us
Daily Top 2Weekly Top 5

"त्याचा फोटो बघताच मी प्रेमात पडले", होणाऱ्या नवऱ्याबद्दल पूजा सावंतचा खुलासा, "माझ्या आईच्या मैत्रिणीने..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2023 11:11 IST

पूजाने 'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत तिच्या होणाऱ्या नवऱ्याबद्दल उघडपणे भाष्य केलं. पूजाने त्यांची पहिली भेट, लव्हस्टोरी याबाबत मुलाखतीत खुलासा केला.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री पूजा सावंत गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. अलिकडेच पूजाने प्रेमाची कबुली दिली होती. होणाऱ्या नवऱ्याबरोबरचे फोटो शेअर करत पुजाने गुपचूप साखरपुडा उरकल्याचं सांगत चाहत्यांना सुखद धक्का दिला होता.  आता पहिल्यांदाच पूजाने लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत तिच्या होणाऱ्या नवऱ्याबद्दल उघडपणे भाष्य केलं. पूजाने त्यांची पहिली भेट, लव्हस्टोरी याबाबत मुलाखतीत खुलासा केला. 

पूजा म्हणाली, "मी खरं तर शॉकच होते. मला कधीच वाटलं नव्हतं की असं काही होईल. आम्ही अरेंज मॅरेज पद्धतीने भेटलो होतो. त्याचं मला स्थळ आलं होतं. माझ्या आईच्या मैत्रिणीने त्याचं स्थळ आणलं होतं. फोटो पाहताच मला तो आवडला होता. मग मी त्याला पहिला फोन केला होता. त्यानंतर मग आमचं बोलणं सुरू झालं आणि मग हळूहळू आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो. सगळ्यांना असं वाटत होतं की एवढं काय गुपित ठेवलं. पण, गुपित होतं तेच चांगलं होतं. कारण, त्यामुळे आम्हाला एकमेकांना जाणून घेण्यासाठी वेळ मिळाला. आणि तो वेळ मिळणं फार गरजेचं होतं. जेव्हा आम्हाला वाटलं की आता आम्हाला लग्न करायचंय तेव्हा आम्ही कुटुंबीयांना सांगितलं." 

"जेव्हा मुलगा किंवा मुलगी लग्नाच्या वयात येतात, तेव्हा घरचे खूप मागे लागतात. माझ्याही मागे लागले होते. पण, आईवडिलांनी कधीच प्रेशर केलं नाही. पण, त्यांचं एकच म्हणणं होतं की तू अशी मुलगी आहेस जिला नेहमीच लग्न करायचं होतं. जेव्हा मी सिद्धेशचा फोटो पाहिला होता, तेव्हाच माझी पहिली घंटा वाजली होती. सुरुवातीला पहिले काही महिने आम्ही फोनवरच बोलत होतो. बोलता बोलता जाणवलं की तो खूप साधा आणि सरळ आहे. त्यानंतर मग जेव्हा आम्ही भेटलो तेव्हा त्याला बघताच दुसरी घंटा वाजली. त्यानंतर मग आम्ही एकमेकांसोबत बराच वेळ घालवला. मग, आम्ही कुटुंबीयांना सांगितलं," असंही ती पुढे म्हणाली. 

पूजाच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव सिद्धेश चव्हाण असं आहे. सिद्धेश हा अभिनय क्षेत्रातील नसून परदेशात असतो, अशा चर्चा रंगल्या आहेत. पूजाने सिद्धेशबरोबरचे फोटो पोस्ट करत साखरपुडा केल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर आता तिच्या लग्नाच्या चर्चा रंगल्या आहेत. 

टॅग्स :पूजा सावंतमराठी अभिनेतासेलिब्रिटी