Join us

अक्षर कोठारी झळकणार क्वीन मेकर या नाटकात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2017 10:36 IST

अक्षर कोठारीने कमला या मालिकेत काम केले होते. या मालिकेतील त्यांच्या कामाचे चांगलेच कौतुक झाले होते. तो सध्या चाहुल ...

अक्षर कोठारीने कमला या मालिकेत काम केले होते. या मालिकेतील त्यांच्या कामाचे चांगलेच कौतुक झाले होते. तो सध्या चाहुल या मालिकेत झळकत आहे. चाहुल या मालिकेतील त्याची व्यक्तिरेखादेखील प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. त्याचसोबत प्रियांका चोप्रा निर्मिती करत असलेल्या काय रे रास्कला या चित्रपटात तो काम करत आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण काहीच दिवसांपूर्वी सोलापूरमध्ये करण्यात आले होते आणि आता अक्षर एका नाटकात काम करणार आहे. अक्षय सध्या कामात व्यग्र असल्याने खूपच खूश आहे.क्वीन मेकर असे अक्षर काम करत असलेल्या नाटकाचे नाव असून या नाटकाचे दिग्दर्शन राजन ताम्हाणे करणार आहेत तर नागेश भोसले यांच्या पत्नी जॉय भोसले या नाटकाची निर्मिती करणार आहेत. या नाटकाचे नेपथ्य प्रदीप मुळे यांचे असणार आहे. अक्षर साकारत असलेल्या पात्राभोवतीच या नाटकाची कथा फिरणार असून अक्षरसोबत शितल क्षीरसागर प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. याविषयी अक्षर सांगतो, "या नाटकातील माझी भूमिका ही सगळ्यात महत्त्वाची आहे. या नाटकाबद्दल मला राजन ताम्हाणे यांनी विचारले असता मी क्षणात या नाटकासाठी होकार दिला. नाटकात काम करण्याची माझी अनेक दिवसांपासूनची इच्छा होती आणि या नाटकाची टीम, कथानक सगळे काही मला खूप आवडल्याने या नाटकात मी काम करायचे ठरवले. मी चाहुल ही मालिका करत असल्याने मी नाटकाला कसा वेळ देणार हा खरा प्रश्न होता. पण यात मालिकेच्या निर्मित्यांनी मला समजून घेतले. त्यामुळेच मला नाटकात काम करता येत आहे. सध्या मी सकाळी सात ते दुपारी एक मालिकेचे चित्रीकरण करत आहे तर दुपारी दोन ते रात्री दहा नाटकाच्या तालमीला वेळ देत आहे. या नाटकाची तालीम जोरदार सुरू असून हे नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे."