Join us
Daily Top 2Weekly Top 5

'द प्ले दॅट गोज राँग' आता मराठीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2019 06:30 IST

लेखक-दिग्दर्शक केदार शिंदे लवकरच एक नवेकोरे नाटक प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहेत.

मराठी नाटक, मालिका आणि सिनेमा या तिन्ही माध्यमांत आपली मोहोर उमटवणारे लेखक-दिग्दर्शक केदार शिंदे लवकरच एक नवेकोरे नाटक प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहेत. 'वाजले कि बारा!’ असे या नाटकाचे नाव असून, बाॅलिवूड अभिनेता शर्मन जोशीच्या शर्मन जोशी प्रोडक्शन प्रस्तुत आणि स्वामी क्रिएशन निर्मित सादर होत असलेल्या या नाटकाचा, महाराष्ट्र दिनानिमित्ताने सिद्धिविनायकाच्या चरणी श्रीगणेशा करण्यात आला. 

केदार शिंदे दिग्दर्शित हे नाटक 'द प्ले दॅट गोज राँग' या वेस्टएन्ड आणि ब्राॅडवे म्हणजेच लंडन अमेरिकेत गाजलेल्या नाटकाचे अधिकृत रिमेक असल्याचे सांगितले जात आहे. जुलै-ऑगस्टदरम्यान प्रेक्षकांच्या भेटीस येत असलेल्या या नाटकाद्वारे शर्मन जोशी प्रस्तुतकर्त्याच्या भूमिकेतून मराठी नाट्यसृष्टीत आपले पहिले पाऊल टाकत आहे.  

'द प्ले दॅट गोज राँग' हे नाटक वेस्टएन्ड व ब्रॉडवे म्हणजेच लंडन आणि अमेरिकेत सुपरहिट चालत आहे. हे नाटक केदार - शर्मन जोडीने गुजराती आणि इंग्रजी भाषेत भारतात सादर करण्याचे धाडस यापूर्वी केले होते. विशेष म्हणजे, 'द प्ले दॅट गोज राँग' च्या या रिमेकला भारतीय प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे या नाटकाचा मराठी रिमेक असलेले 'वाजले कि बारा!’ हे नाटक मराठी प्रेक्षकांनादेखील आवडेल, याची खात्री या दोघांना आहे.  

केदार शिंदे यांनी दिग्दर्शित केलेली 'तू तू मी मी', 'सही रे सही', 'लोचा झाला रे', 'श्रीमंत दामोदर पंत', 'गेला उडत', 'सौजन्याची ऐशी तैशी' यांसारखी दर्जेदार नाटके मराठी रंगभूमीवर गाजली. मात्र त्यानंतर त्यांनी आपला मोर्चा हिंदी आणि गुजराती नाटकाकडे वळवला होता. 'वाजले कि बारा!’च्या निमित्ताने केदार शिंदे तब्बल तीन वर्षानंतर पुन्हा एकदा मराठी रंगभूमीकडे परतले आहेत. 

केदार शिंदे यांनी 'सही रे सही' हे नाटक शर्मनच्या सोबतीने 'राजू राजा राम और मैं' या रिमेकद्वारे हिंदी रंगभूमीवर आणले होते. गुजराती, हिंदी आणि इंग्रजी रंगभूमीवर सुपरहीट ठरलेली केदार-शर्मनची जोडी, आता मराठी रंगभूमीवर धम्माल करण्यास सज्ज झाली आहे. त्यामुळे 'द प्ले दॅट गोज राँग'चे मराठी व्हर्जन कसे असेल, याची उत्सुकता नाट्यरसिकांना लागली आहे.

टॅग्स :केदार शिंदेशरमन जोशी