बॉबी देओलची सुपरहिट वेबसीरिज आश्रममध्ये पम्मी पहलवानच्या भूमिकेतून अभिनेत्री अदिती पोहनकर (Aaditi Pohankar) घराघरात पोहचली. अदिती लवकरच एका मराठी चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाचं नाव आहे 'पाहिले मी तुला'. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर अदिती पोहनकर आणि भूषण पाटील अभिनीत 'पाहिले मी तुला'च्या निर्मात्यांनी चित्रपटाचे पोस्टर रिलीज केले आहे.
कौटुंबिक नाट्य असलेल्या या चित्रपटात आयुष आणि अलिशा यांच्या भूमिकेतील भूषण आणि अदिती यांची प्रेमकहाणी पहायला मिळणार आहे. त्यांचं प्रेम फुलणार की त्यात अडचणी येणार हे जाणून घेण्यासाठी आपल्याला प्रतीक्षा करावी लागेल. अदिती पोहनकर म्हणाली की, मी या चित्रपटाबाबत खूपच उत्सुक आहे. नाटयमय वळणांची हि खूप गोड, इन्टेन्स लव्ह स्टोरी आहे. जेव्हा मला या स्टोरीचं नॅरेशन देण्यात आलं तेव्हा मी इतकी मोहित झाले की कथेच्या शेवटी काय घडतं ते जाणून घेण्यास उत्सुक झाले. मला खात्री आहे की प्रेक्षकही चित्रपट पाहिल्यानंतर आकर्षित होतील. मी चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाट पाहत आहे.
चित्रपटाची कथा सारंग पवार आणि सुशील पाटील यांची आहे. पटकथा आणि संवादलेखन अभय अरुण इनामदार यांनी केलं आहे. मनोज कोटियान दिग्दर्शित या सिनेमाची निर्मिती निर्माते सुशील पाटील, निलेश लोणकर, अरविंद राजपूत यांनी एनएसके श्री फिल्म्स इंटरनॅशनलच्या बॅनरखाली केली असून, सिनेमास्टर्स एंटरटेन्मेंट प्रस्तुतकर्ते आहेत. समीर दीक्षित आणि ऋषिकेश भिरंगी यांचे पिकल एन्टरटेन्मेंट अँड मीडिया प्रा. लि. या चित्रपटाचे वितरक आहेत.