Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘Once मोअर’ या दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2019 15:42 IST

‘Once मोअर’ या चित्रपटाचा शानदार संगीत अनावरण सोहळा ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजरेकर व ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांच्या हस्ते नुकताच संपन्न झाला.

‘लॉजिकल जगातील मॅजिकल गोष्ट’.... एका नवरा बायकोच्या नात्यांतील अशाच रहस्याचा उलगडा करणाऱ्या आगामी ‘Once मोअर’ या चित्रपटाचा शानदार संगीत अनावरण सोहळा ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजरेकर व ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांच्या हस्ते नुकताच संपन्न झाला. यावेळी चित्रपटाच्या टीझरची झलक प्रकाशित करण्यात आली. येत्या १ ऑगस्टला ‘Once मोअर’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

 

दिग्दर्शक नरेश बिडकर यांच्या प्रयत्नांचे कौतुक करताना दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी चित्रपटाला शुभेच्छा दिल्या. हा चित्रपट प्रत्येकाला जगण्याचा एक वेगळा दृष्टीकोन देईल, असा विश्वास दिग्दर्शक नरेश बिडकर आणि चित्रपटाच्या लेखिका श्वेता बिडकर यांनी याप्रसंगी व्यक्त केला.  वेगवेगळ्या पठडीतली 3 गाणी या चित्रपटात आहेत. श्वेता बिडकर लिखित या गीतांना शैलेंद्र बर्वे यांनी संगीत दिले आहे. सौरभ भालेराव यांनी पार्श्वसंगीताची जबाबदारी सांभाळली आहे. स्वप्नील बांदोडकर, नकाश अजिज, हमसिका अय्यर या गायकांनी यातील गाणी स्वरबद्ध केली आहेत.

रोहिणी हट्टंगडी, पूर्णिमा तळवलकर, भारत गणेशपुरे, विष्णू मनोहर, नरेश बीडकर आदि सिनेसृष्टीतील अनुभवी कलाकारांसोबत आशुतोष पत्की आणि धनश्री दळवी हे दोन नवे चेहरे चित्रपटात दिसणार आहेत. वंशिका क्रिएशन, देवस्व प्रोडक्शन तसेच लवंदे फिल्म व विष्णू मनोहर फिल्म यांच्या संयुक्त विद्यमाने या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. छोट्या पडद्यावरील अनेक मालिकांच्या माध्यमातून भेटीला आलेले दिग्दर्शक-अभिनेता नरेश बीडकर यांनी दिग्दर्शित केलेला ‘Once मोअर’ हा पहिला चित्रपट आहे. या चित्रपटाचे लेखन श्वेता बिडकर यांनी केले आहे. धनश्री विनोद पाटील, सुहास जहागीरदार, निलेश लवंदे विष्णू मनोहर आणि डॉ. विनित बांदिवडेकर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. अभय ठाकूर, सुदिप नाईक, संपदा नाईक आणि व्ही.टी एच.एटंरटेन्मेंट सहनिर्माते आहेत. छायांकनाची संजय सिंग तर संकलनाची जबाबदारी निलेश गावंड यांनी सांभाळली आहे. कलादिग्दर्शन देवदास भंडारे यांचे असून नृत्यदिग्दर्शन चिन्नी प्रकाश, संदेश चव्हाण, श्वेता-तेजस यांचे आहे. चैत्राली डोंगरे वेशभूषा तर रंगभूषा श्रीनिवास मेनगु यांची आहे. प्रोस्थेटिक मेकअप रमेश मोहंती, कमलेश गोथिडे यांनी केला आहे. साहस दृश्याची जबाबदारी प्रशांत नाईक यांनी सांभाळली आहे. १ ऑगस्टला ‘Once मोअर’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

टॅग्स :महेश मांजरेकर