Join us

ओली की सुकी... लवकरच

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2016 16:55 IST

        मराठी चित्रपट आता बॉक्स ऑफिसवर देखील चांगली कमाई करु लागले आहेत. वेगवेगळे विषय मराठीत येऊ ...

        मराठी चित्रपट आता बॉक्स ऑफिसवर देखील चांगली कमाई करु लागले आहेत. वेगवेगळे विषय मराठीत येऊ लागले आहेत. मुळात मराठी चित्रपट हे आशयघन असल्याचे सर्वजण बोलतात. असाच एक हटके विषय आता पुन्हा एकदा मराठी सिनेमात दिसणार आहे. 'ओली की सुकी' असे या चित्रपटाचे नाव आहे. हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. काही दिवसांपूर्वी 'ओली की सुकी' या चित्रपटाचे टीझर पोस्टर सोशल मिडीयावर प्रदर्शित करण्यात आले होते आणि आता या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. ''जिंदगीला रिव्हर्स नाही...पण आम्ही तो टाकला'' असं म्हणत या चित्रपटाचे टीझर पोस्टर रिलीज करण्यात आले होते. माझं घर माझं संकूल प्रस्तुत आणि नलिनोत्तम प्रॉडक्शन 'ओली की सुकी' या सिनेमाचे दिग्दर्शन आनंद गोखले यांनी केले आहे तर वैभव जोशी यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. जिंदगीला नडणारे आवडतात, रडणारे नाय...! आणि परिस्थिती बदलली की माणूस बदलतो आणि माणूस बदलला की त्याच्या चेहऱ्यावर मुखवटे येतात, असं या टीझरमध्येच सांगण्यात आलं आहे. आता चित्रपटातील नेमकी परिस्थिती काय आहे आणि त्यात आपल्या आवडत्या कलाकारांनी कोणती भूमिका साकारली आहे हे आपल्याला चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच समजेल. मात्र या चित्रपटाचे नाव जरा वेगळे असल्याने यामध्ये नक्कीच काय असणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. अनेक कलाकारांनी सोशल साईट्सवर या चित्रपटाचे पोस्टर देखील शेअर केले आहे. हटके डायलॉग आणि इंटरेस्टींग पोस्टर असलेला हा चित्रपट १६ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.