Join us
Daily Top 2Weekly Top 5

खुलासा! नितीन देसाईंच्या डोक्यावर होतं भलंमोठं कर्ज; आकडा आला समोर, तपास सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2023 14:21 IST

नितीन देसाई यांनी आत्महत्या का केली याचा शोध पोलीस घेत आहेत. तत्पूर्वी प्राथमिक चौकशीत नितीन देसाई आर्थिक संकटात अडकले होते अशी माहिती समोर आली आहे.

पनवेल – कलादिग्दर्शक नितीन देसाईंच्या आत्महत्येने मराठी सिनेसृष्टीसह हिंदी सिनेक्षेत्राला मोठा फटका बसला आहे. बॉलिवूडमध्ये नितीन देसाईंनी अनेक भव्यदिव्य सेट उभारले होते. नितीन देसाईंनी बुधवारी सकाळी आत्महत्या केली. देसाईंच्या आत्महत्येने अनेकांना धक्का बसला. नितीन देसाईंची अचानक एक्झिट यावर विश्वास ठेवणेही अनेकांना शक्य झालं नाही. वयाच्या ५७ व्या वर्षी त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले.

नितीन देसाई यांनी आत्महत्या का केली याचा शोध पोलीस घेत आहेत. तत्पूर्वी प्राथमिक चौकशीत नितीन देसाई आर्थिक संकटात अडकले होते अशी माहिती समोर आली आहे. पीटीआय रिपोर्टनुसार, नितीन देसाई यांच्यावर २५२ कोटी रुपयांचे कर्जाचा बोझा होता. देसाई यांच्या कंपनीला मागील आठवड्यात न्यायालयाने डिफॉल्टर मान्य केले होते. नितीन देसाईंच्या ND’s Arts World PVT LTD ने २०१६ आणि २०१८ मध्ये ECL फायनान्सकडून सुमारे १८५ कोटींची २ कर्ज घेतली होती. जानेवारी २०२० पासून त्यांच्यामागे कर्ज परतफेडीचा ससेमिरा सुरू झाला होता.

NCTL नं पारित केलेल्या आदेशानुसार, ३० जून २०२२ रोजी नितीन देसाई यांच्या कंपनीवर २५२.४८ कोटींचे कर्ज थकबाकी होती. ७ मे २०२१ रोजी नितीन देसाई यांच्या एनडी स्टुडिओला आग लागली होती. त्यात प्रचंड नुकसान झाले होते. त्यातच कर्ज पुरवठादारांनीही नितीन देसाईंना कर्जाच्या वसुलीबाबत नोटीस पाठवली होती. इतकेच नाही तर गेल्या काही महिन्यांपासून ND स्टुडिओचा ताबा मिळवण्यासाठी कर्ज देणाऱ्या कंपन्यांनी हालचाल केली होती अशी माहिती समोर आली आहे.

देसाईंचे जवळचे मित्र असलेले भाजपाचे सरचिटणीस विनोद तावडे यांनी सांगितले की, “मी अनेकदा त्यांच्याशी बोलायचो आणि सल्लाही द्यायचो. अमिताभ बच्चन यांचे खूप नुकसान झाले आणि ते पुन्हा उभे राहिले. कर्जामुळे स्टुडिओ हातून गेला तरी तो नव्याने सुरू करू शकतो असंही मी त्यांना सांगितले होते. आता नितीन देसाईंच्या मृत्यूबद्दल ऐकून खूप वाईट वाटले अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

टॅग्स :नितीन चंद्रकांत देसाई