निर्भया 6 ऑक्टोबरला चित्रपटगृहात
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2017 17:29 IST
आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या अनेक घटनांचे प्रतिबिंब चित्रपटाच्या माध्यमातून उमटत असते. आज समाजात जे घडतंय ते दाखवण्याचा प्रयत्न दिग्दर्शक आनंद ...
निर्भया 6 ऑक्टोबरला चित्रपटगृहात
आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या अनेक घटनांचे प्रतिबिंब चित्रपटाच्या माध्यमातून उमटत असते. आज समाजात जे घडतंय ते दाखवण्याचा प्रयत्न दिग्दर्शक आनंद बच्छाव यांनी आगामी निर्भया या चित्रपटातून केला आहे. स्वानंदी प्रोडक्शन प्रस्तुत निर्भया हा मराठी सिनेमा 6 ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या चित्रपटाची निर्मिती अमोल अहिरराव यांनी केली आहे.रोज वर्तमानपत्र उघडलं की, महिला अत्याचाराच्या बातम्या नजरेला पडतात त्या बातम्यांची तीव्रता एवढी भीषण आहे की, आता त्या वाचून वाटणारी अस्वस्थता कमी होत चालली आहे की काय अशी शंका येऊ लागलेली आहे. कुठल्या दिशेला चाललोय आपण? आणि या सगळ्या परीस्थितीवर उत्तर काय ? या प्रश्नाला वाचा फोडण्याचा प्रयत्न निर्भया सिनेमातून निर्माते व दिग्दर्शकांनी केला आहे.या चित्रपटाचे कथानक महिलांवर होणाऱ्या अत्याचारावर आधारित आहे. महिला सुरक्षिततेची समस्या हा कळीचा मुद्दा असून हा मुद्दा अधोरेखित करत निर्भयाची कथा चित्रपटातून मांडण्यात आली आहे. निर्भयाच्या आयुष्यात घडणाऱ्या एका दुर्देवी घटनेमुळे तिच्या आयुष्यात काय उलथापालथ होते ? या सगळ्याला ती कशाप्रकारे सामोरे जाते याची मन हेलवणारी कथा म्हणजे निर्भया सिनेमा. या चित्रपटात योगिता दांडेकर निर्भयाच्या मुख्य भूमिकेत असून तिच्यासोबत स्मिता जयकर, किशोर महाबोले, अनिकेत केळकर, अभिजीत कुलकर्णी, ओंकार कर्वे, ज्ञानेश्वर वाघ, पूजा राज, यांच्या भूमिका आहेत. चित्रपटात वेगवेगळ्या जॉंनरची चार गाणी असून ती आदर्श शिंदे, महमद अजीज, रुतु पाठक, उत्तरा केळकर, शाहीद मलिया, कविता निकम, श्रुती घोष यांनी गायली आहेत. गीते बाबासाहेब सौदागर, अभिजीत कुलकर्णी, ज्ञानेश्वर वाघ यांनी लिहिली असून संगीत देव-आशिष यांचं आहे. कथा संतोष हुदलीकर यांची असून पटकथा-संवाद डॉ. मुरलीधर भावसार यांचे आहेत. संकलन विनोद चौरसिया तर छायांकन मनिष पटेल यांचं आहे. सहनिर्माते नितीन पाटील आहेत.