Join us

दिग्दर्शक महेश लिमयेच्या नजरेतून दिसणार देवभूमीचे निसर्गसौंदर्य, ‘जग्गु आणि Juliet’चा मुहूर्त संपन्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2021 17:53 IST

‘जग्गु आणि Juliet’ या चित्रपटाच्या चित्रीकरणाचा मुहूर्त नुकताच निसर्ग सौंदर्याने नटलेल्या देवभूमी उत्तराखंड मध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

निर्माते पुनीत बालन यांच्या ‘पुनीत बालन स्टुडिओज’च्या वतीने आगामी बिग बजेट ‘जग्गु आणि Juliet’ चित्रपटाची घोषणा काही दिवसांपूर्वी करण्यात आली. कोरोनाच्या संकाटातून हळूहळू सावरत असताना मराठीतील बिग बजेट चित्रपटाच्या घोषणेमुळे चित्रपटसृष्टीत सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.  ‘जग्गु आणि Juliet’ या चित्रपटाच्या चित्रीकरणाचा मुहूर्त नुकताच निसर्ग सौंदर्याने नटलेल्या देवभूमी उत्तराखंड मध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला.  

सुप्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर महेश लिमये दिग्दर्शित आणि सुप्रसिद्ध संगीतकार अजय– अतुल यांचे अतुलनीय संगीत लाभलेल्या या चित्रपटाचे उत्कंठावर्धक असे पहिले पोस्टर सोशल मीडियावर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले होते. या पोस्टरमध्ये युकेची पार्श्वभूमी दिसत होती, ‘जग्गु आणि Juliet’  चे ९० टक्के चित्रीकरण युरोपमध्ये होणार होते. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर  घालण्यात आलेल्या विविध निर्बंधामुळे परदेशात न जाता आपल्याच देशात चित्रीकरण करून ‘आत्मनिर्भर भारत’ मोहीमेला अधिक बळ देण्याचा निश्चय निर्माते पुनीत बालन यांनी केला. यामुळे आता युरोपातील युकेऐवजी भारतातील युकेअर्थात देवभूमी उत्तराखंडमध्ये ‘जग्गु आणि Juliet’ चे चित्रीकरण होणार आहे.

 ‘जग्गु आणि Juliet’ च्या निमित्ताने मराठी चित्रपटात नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या, देवभूमी अशी ओळख असलेल्या उत्तराखंड मधील प्रेक्षणीय स्थळे दिसणार आहेत. राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक महेश लिमये यांच्या दिग्दर्शकीय व्हिजन बरोबरच त्यांच्या कॅमेऱ्याच्या नजरेतून देवभूमीचे बहरलेले सौंदर्य पहाणे ही प्रेक्षकांना मोठी पर्वणी ठरणार हे निश्चित.

‘मुळशी पॅटर्न’ या सामाजिक विषयावरील चित्रपटाच्या सुपरहिट यशानंतर ‘पुनीत बालन स्टुडीओज’ घेऊन येत असलेल्या ‘जग्गु आणि Juliet’ बद्दल महाराष्ट्रासह जगभरातील मराठी प्रेक्षकांच्या मनात मोठी उत्सुकता आहे. या ‘रॉमकॉम’ चित्रपटात कोणते कलाकार आहेत? हे अद्याप गुलदस्त्यात आहे, ‘जग्गु आणि Juliet’ चे चित्रीकरण २०२१ मध्ये पूर्ण होईल व त्यानंतर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.