Join us

राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या शिवाजी लोटन पाटील यांचा ‘हलाल’

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2017 15:46 IST

२०१२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘धग’ या मराठी चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा राष्ट्रीय पुरस्कार पटकावणारे दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील ‘हलाल’ हा ...

२०१२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘धग’ या मराठी चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा राष्ट्रीय पुरस्कार पटकावणारे दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील ‘हलाल’ हा आणखी एक ज्वलंत विषयावर आधारित चित्रपट घेऊन आले आहेत. ‘धग’ या चित्रपटानंतर नंतर ‘३१ ऑक्टोबर’ या हिंदी चित्रपटाचं दिग्दर्शन करणारे पाटील ‘हलाल’च्या निमित्ताने पुन्हा मराठीकडे वळले आहेत.काही दिग्दर्शक समाजातील ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडत जनतेच्या डोळ्यांत अंजन घालण्याचा प्रयत्न करीत त्यांची मनं जिंकून घेतात. शिवाजी लोटन पाटील हे या वर्गवारीत मोडणाऱ्या दिग्दर्शकांपैकी आहेत. याच कारणामुळे पहिल्याच प्रयत्नात राष्ट्रीय पुरस्कारावर नाव कोरण्याचा पराक्रम करण्यात पाटील यशस्वी झाले आहेत. अमोल कागणे फिल्म्सच्या बॅनरखाली तयार झालेला ‘हलाल’ हा चित्रपट पाटील यांचा दुसरा मराठी चित्रपट आहे. लेखक राजन खान यांच्या ‘हलाला’ कथेवर आधारित असलेल्या या चित्रपटात पाटील यांनी एक त्रिकोणी प्रेमकथा सादर केली आहे.आजच्या आधुनिक काळातही मुस्लिम स्त्रिया बंधनांचा बुरखा झुगारण्यात अपयशी ठरत आहेत. तलाकसारख्या मुद्द्याच्या माध्यमातून आजही त्यांची वैचारिक गळचेपी सुरूच असल्याचा प्रत्यय येत आहे. पाटील यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला ‘हलाल’ हा चित्रपट या प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारा आहे. चिन्मय मांडलेकर, प्रितम कागणे, प्रियदर्शन जाधव, विजय चव्हाण, छाया कदम, अमोल कागणे, विमल म्हात्रे, संजय सुगावकर आदी कलाकारांनी या चित्रपटात विविध व्यक्तिरेखा साकालल्या आहेत. अमोल कागणे आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते लक्ष्मण कागणे यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटाची पटकथा-संवाद निशांत धापसे यांनी लिहिले आहेत. आजवर बऱ्याच राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरील चित्रपट महोत्सवांमध्ये आपला ठसा उमटविण्यात यशस्वी झालेला शिवाजी लोटन पाटील यांचा ‘हलाल’ ६ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.'हलाल' चित्रपटानेही मुस्लीम स्त्रियांच्या व्यथा, वेदना मांडत वास्तववादी सामाजिक प्रश्नाला स्पर्श केला आहे.अभिनेता चिन्मय मांडलेकर, प्रितम कांगणे, प्रियदर्शन जाधव, विजय चव्हाण, छाया कदम, अमोल कांगणे, विमल म्हात्रे, संजय सुगावकर या कलाकारांच्या हलाल मध्ये महत्त्वाच्या भूमिका आहेत. पटकथा आणि संवाद निशांत धापसे यांचे आहेत.