Join us
Daily Top 2Weekly Top 5

नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरेंची 'अशी' झाली होती पहिली भेट; ३२ वर्षांपूर्वीचा 'तो' किस्सा चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 13:01 IST

"तू मुंबईला ये, मी तुला मदत करेन" नाना पाटेकरांनी कसं बदललं मकरंद अनासपुरेंचं आयुष्य?

Nana Patekar Makarand Anaspure First Meet :मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते मकरंद अनासपुरे आणि नाना पाटेकर यांची जोडी आज 'नाम फाउंडेशन'च्या माध्यमातून समाजसेवा करताना दिसते.  मात्र, या दोघांच्या नात्याची वीण तब्बल ३२ वर्षांपूर्वी एका एकांकिका स्पर्धेत विणली गेली होती. नुकत्याच एका मुलाखतीत मकरंद अनासपुरे यांनी नाना पाटेकरांनी त्यांना सिनेसृष्टीत पहिली संधी कशी दिली, याचा रंजक किस्सा सांगितला आहे.

'अभिजात मराठी फिल्मी' या युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत मकरंद यांनी १९९४ सालची आठवण सांगितली. ते म्हणाले, "कॉलेजमध्ये असताना नेहरू सेंटरमध्ये 'कल्पना एक आविष्कार अनेक' ही एकांकिका स्पर्धा होती. मी औरंगाबादहून (छत्रपती संभाजीनगर) या स्पर्धेसाठी आलो होतो. तेव्हा नाना पाटेकर प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. मी नेहरू सेंटरच्या बाहेर असताना ते जीपमधून आले आणि त्यांनी मला 'अरे, त्या औरंगाबादच्या मुलांची एकांकिका झाली का रे?' असं विचारलं. तेव्हा मी त्यांना हो बोललो की नाही हेही मला आता आठवत नाही. पण त्यांना प्रत्यक्षात पाहून मी भारावूनच गेलो होतो. त्यांचा जुना 'सावित्री' सिनेमा पाहून मी त्यांचा चाहता झालो होतो. 'क्रांतिवीर' आणि 'तिरंगा'मुळे नानांची तेव्हा मोठी क्रेझ होती. त्यांना प्रत्यक्षात पाहून मी भारावून गेलो होतो".

मकरंद यांची एकांकिका पाहिल्यानंतर नाना पाटेकर स्वतः त्यांच्याकडे आले आणि म्हणाले, "तुला बक्षीस मिळेल की नाही माहीत नाही, पण तू नंतर समोर असशील तर मी तुझ्याबद्दल बोलेन". भाषणादरम्यान नानांनी मकरंद यांच्या कलेचं कौतुक केलं आणि त्यांना थेट मुंबईला येण्याचं आमंत्रण दिलं. "तू मुंबईला ये, तुझ्यासारख्या कलावंताचं नक्कीच काहीतरी होऊ शकतं, मी तुला मदत करेन", असे शब्द नानांनी मकरंद यांना दिले होते.

'यशवंत' चित्रपटातून मिळाली पहिली संधीनानांनी केवळ शब्दच दिला नाही, तर तो पाळलाही. मकरंद अनासपुरे मुंबईत आल्यानंतर नानांनी त्यांना त्यांच्या 'यशवंत' या गाजलेल्या चित्रपटात एक छोटी भूमिका दिली. इतकंच नाही, तर सहायक दिग्दर्शकाच्या यादीतही मकरंद यांचं नाव समाविष्ट केलं. "सुरुवातीच्या काळात ज्या आधाराची गरज असते, तो आधार नानांनी मला दिला. म्हणूनच मी त्यांना माझे गुरू मानतो", अशा भावना मकरंद यांनी व्यक्त केल्या.

English
हिंदी सारांश
Web Title : Nana Patekar's first encounter with Makarand Anaspure: A 32-year-old story

Web Summary : Makarand Anaspure recounts his first meeting with Nana Patekar at a drama competition. Impressed, Nana invited Makarand to Mumbai and gave him a role in 'Yashwant', offering crucial early career support and mentorship.
टॅग्स :नाना पाटेकरमकरंद अनासपुरे