नाना म्हणतात यांना देशाचे खरे हिरो..जाणून घ्या कोण आहेत ते ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2016 15:53 IST
नाना पाटेकर हे नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असतात हे आपल्या सर्वांनाचं माहिती आहे. मनात येईल ...
नाना म्हणतात यांना देशाचे खरे हिरो..जाणून घ्या कोण आहेत ते ?
नाना पाटेकर हे नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असतात हे आपल्या सर्वांनाचं माहिती आहे. मनात येईल त्या गोष्टी निर्भिडपणे मांडण्यामध्ये नाना जराही धजावत नाहीत. नुकतेच नानांनी सीमेवरील जवानांची जाऊन भेट घेतली. जम्मू काश्मीरमधील कठुआ बॉर्डरवर जाऊन नाना पाटेकर बीएसएफ जवानांना भेटले. जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून सीमेवर सतत गोळीबार सुरू होता. सैनिकी प्रशिक्षण घेतलेल्या नानांनी जवानांची विचारपूस करून देश त्यांच्या पाठीशी असल्याचा विश्वास दिला. नाना पाटेकर बीएसएफ जवानांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी अधिकाऱ्यांसह थेट फॉर्वर्ड पोस्टवर गेले होते. जवानांच्या हाती असलेल्या आधुनिक शस्त्रसामुग्रीचीही माहिती त्यांनी घेतली. वर्दीमध्ये राहून सीमेचे रक्षण करणारे सैनिकच देशाचे खरे हिरो. आपल्या देशाचे संरक्षण करण्यासाठी ते प्रत्येक क्षण लढताहेत, असल्याचे नाना म्हणाले. बीएसएफ तळाला भेट देऊन जवानांशी बोलण्याची मोठी संधी मला मिळाली. संपूर्ण देश त्यांच्या पाठीशी ठाम उभा आहे, असा विश्वास नानांनी जवानांना दिला. तसेच नानांनी शहिदांच्या स्मारकाला भेट देऊन आदरांजली वाहिली. नाना पाटेकर हे नाव आज हिंदी-मराठी चित्रपटसृष्टीत आदराने घेतले जाते. नानांनी अनेक दर्जेदार चित्रपटांमध्ये उत्तम भूमिका साकारुन स्वत:ची छाप रसिक प्रेक्षकांच्या मनावर उमटविलीच आहे. परंतु सामाजिक कार्य करुन लोकांच्या मनामध्ये नानांनी वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्यांनी समाजातील अनेक प्रश्नांवर सातत्याने भाष्य केले आहे. शेतकऱ्यांच्या समस्या देखील सोडविण्याचा नेहमीच प्रयत्न केला. नानांनी सीमेवरील जवानांना दिलेली ही भेट नक्कीच त्यांचे मनोबल वाढविण्यास मदत करेल यात काही शंकाच नाही.