Join us

माझा सगळा वेळ ‘तिच्या’साठीच...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2016 15:14 IST

अभिनेता स्वप्नील जोशीच्या घरात चिमुकल्या परीचे आगमन 23 मेला झाले. त्याच्या या परीमुळे त्याचे आयुष्यच संपूर्ण बदलले आहे. ‘सध्या ...

अभिनेता स्वप्नील जोशीच्या घरात चिमुकल्या परीचे आगमन 23 मेला झाले. त्याच्या या परीमुळे त्याचे आयुष्यच संपूर्ण बदलले आहे. ‘सध्या माझा संपूर्ण वेळ हा केवळ तिचा आहे’ असे स्वप्निल सांगतोय. स्वप्निलच्या या परीविषयी त्याच्याकडूनच जाणून घेऊया...‘‘वडील होणे ही भावना किती सुंदर असते असे मी अनेकांकडून ऐकले होते. पण, आज खºया अर्थाने मी हे अनुभवत आहे. आमच्या घरात नव्या सदस्याचे आगमन होणार असे ज्यावेळी मला आणि लीनाला कळले, त्या दिवसापासूनच आम्ही प्रचंड आनंदित झालो होतो. त्या दिवसापासूनच आम्ही या नव्या सदस्याच्या आगमनाची स्वप्ने पाहू लागलो होतो. हा सदस्य यायच्या आधीच या सदस्याच्या स्वागताची तयारी आम्ही सुरू केली होती. लीनाला दिवस गेलेत हे मला ज्यावेळी कळले, तेव्हाच माज्या बाळाच्या जन्मानंतर दोन महिने तरी मी काहीही काम करणार नाही असे मी ठरवले होते.’’  मुले मोठी झाली की, ती आपल्या अभ्यासात, आपल्या दैनंदिन गोष्टीत प्रचंड व्यस्त होतात. त्यांनाही आपल्यासाठी वेळ नसतो. त्यामुळे बाळ लहान असतानाच त्याच्यासोबत जास्तीत जास्त वेळ घालवावा असे माझे मित्रमैत्रीण मला नेहमी सांगायचे. त्यांचाच सल्ला ऐकून मी दोन महिने तरी केवळ माज्या परीलाच द्यायचे असे ठरवले. तिचा जन्म 23 तारखेला झाला आणि 27 मे रोजी ‘लाल इश्क’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर सध्या मी कोणतेही काम करत नाहीये. मी 20 जुलै नंतर पुन्हा माझ्या कामांना सुरुवात करणार आहे.आम्हा दोघांनाही मुलीची प्रचंड आवड आहे. त्यामुळे आम्हाला मुलगीच व्हावी अशी आम्ही दोघेही प्रार्थना करत होतो. माझी मुलगी जन्मली त्या क्षणी मला झालेला आनंद मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही. मी लीनासोबत प्रसुतीगृहातच होतो. बाळाचे या जगात येणे, त्यानंतर काही क्षणानंतर तिचे रडणे हे स्वत: मी अनुभवले आहे. तिला पाहिल्यावर मी अक्षरश: रडायला लागलो. मी का रडत आहे, मला काय झाले आहे हे मला काहीच कळत नव्हते. तिला काही वेळानंतर गुंडाळून ज्यावेळी समोर आणले, त्यावेळी ती मस्त शांतपणे झोपली होती. त्यावेळी कुठे मी भानावर आलो. अर्धा तास तरी मी एका वेगळ्याच जगात होतो. त्यानंतर माज्या सगळ्या नातलगांना, मित्रांना फोन करून ही गोड बातमी दिली. गेल्या दोन महिन्यात मी कोणतेही चित्रिकरण करत नाहीये तसेच मी कोणत्या मिटिंग्जही ठेवलेल्या नाहीत. मी कुठे बाहेरही जात नाही. माझा संपूर्ण वेळ हा केवळ तिच्यासाठी आहे. मी तिच्यासोबत खेळतो. तिला भरवतो, तिची सू-शीही काढतो. तिची नॅपी बदलतो. एवढंच नव्हे तर मी तिला आंघोळही घालतो. मला या सगळ्या गोष्टी आता चांगल्याच जमायला लागल्या आहेत. या गोष्टी कोणी शिकवायला लागत नाहीत. एकदा बाळ झाले की, माणूस आपोआप सगळे शिकतो असे मला वाटते. पहाटे तीन ते सकाळी सात हा वेळ तिला बहुधा अतिशय आवडतो. कारण त्या वेळात ती एक मिनिटसुद्धा झोपत नाही. त्यामुळे मी आणि लीना दोघेही या वेळात जागे राहतो. मी, लीना आणि आई-बाबांनी तिला सांभाळण्याचा वेळ वाटून घेतला आहे. ती सकाळी सात-आठच्या सुमारास झोपली की आम्ही दोघेही झोपतो. मग ती उठल्यावर माझे आई-बाबा थोडा वेळ तिला सांभाळतात. तोपर्यंत आम्ही आमची झोप पूर्ण करतो. आमच्या या परीचे आम्ही नुकतेच बारसे केले आहे आणि तिचे नाव ‘मायरा’ असे ठेवले आहे. मी आणि लीना दोघांनी मिळून हे नाव ठरवले आहे. मायराचा अर्थ कवीची कल्पना, विलक्षण, कौतुकास पात्र असा होतो. मी 10-15 दिवसांनी चित्रपटाच्या चित्रिकरणाला सुरुवात करणार आहे.चित्रिकरण सुरू झाल्यावर सुरुवातीचे 10 दिवस तरी चित्रिकरण मुंबईतच असणार आहे. त्यामुळे मी रात्री तिला भेटू शकेन. पण त्यानंतर मी मुंबईच्या बाहेर चित्रिकरणाला जाणार आहे. या दरम्यान लीना तिच्या माहेरी औरंगाबादला जाणार आहे. या वेळात मी माझ्या ‘मायरा’ला खूप मिस करणार हे मला चांगलेच माहीत आहे. मला रोमँटिक हिरो म्हणून ओळखले जाते. पण तरीही आज मी मायरावर जितके प्रेम करत आहे, तितके प्रेम ना कधी कोणावर केले आहे नि कोणावर करू शकतो. ‘मुलीचा बाबा’ होण्याची भावनाच वेगळी असते. शब्दांकन : प्राजक्ता चिटणीस