Join us

​प्रफुल्ल कार्लेकर देणार हृदयांतर या चित्रपटाला संगीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2017 18:43 IST

प्रफुल्ल कार्लेकर यांनी अनेक हिंदी चित्रपटांसाठी म्युझिक अरेंजर म्हणून काम केले आहे आणि आता ते एका मराठी चित्रपटाला संगीत ...

प्रफुल्ल कार्लेकर यांनी अनेक हिंदी चित्रपटांसाठी म्युझिक अरेंजर म्हणून काम केले आहे आणि आता ते एका मराठी चित्रपटाला संगीत देणार आहेत. विक्रम फडणवीस दिग्दर्शित करत असलेल्या हृदयांतर या चित्रपटाची सध्या चांगलीच चर्चा आहे. या चित्रपटात मुक्ता बर्वे, सुबोध भावे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. त्यासोबत बॉलिवूडचा सुपरस्टार हृतिक रोशन या चित्रपटात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकत आहे. मराठीत काम करण्याची हृतिकची ही पहिलीच वेळ आहे. त्याचसोबत मनिष पॉलही या चित्रपटात छोट्याशा भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटाची स्टारकास्ट ही प्रचंड तगडी आहे. त्याचसोबत या चित्रपटाचे संगीतही दमदार असावे यासाठी या चित्रपटाची टीम प्रचंड मेहनत घेत आहे. या चित्रपटाच्या संगीताची धुरा प्रफुल्ल कार्लेकर यांच्यावर सोपवण्यात आली आहे. प्रफुल्ल यांनी त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला कांटे, राजू चाचा, कभी ख़ुशी कभी गम, यादें यांसारख्या अनेक सिनेमासाठी ऑडिओ रेकॉर्डिस्ट म्हणून काम केले होते. त्यानंतर त्यांनी वेलकम या चित्रपटातील काही गाण्यांसाठी म्युझिक अरेंजर आणि प्रोग्रॅमर असे काम केले. त्यानंतर त्यांनी बॉलिवूडमधील अनेक गाण्यांसाठी म्युझिक अरेंजरची भूमिका साकारली. हिंदीत अनेक वर्षं काम केल्यानंतर दुनियादारी या चित्रपटाद्वारे ते मराठी चित्रपटसृष्टीत आले. त्यानंतर त्यांनी पोश्टर गर्ल या चित्रपटातील आवाज वाढव डिजे, तू ही रे या चित्रपटातील गुलाबाची कळी या गाण्यांसाठी म्युझिक अरेंजर म्हणून काम केले. गुरू या चित्रपटातील आता लढायचे या गाण्याचे त्यांनी संगीत दिग्दर्शन केले होते. त्यानंतर त्यांना संगीत दिग्दर्शन म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्यांनी वाजलाच पाहिजे आणि तालीम या चित्रपटांना संगीत दिले आणि आता ते हृदयांतर या चित्रपटाला संगीत देणार आहेत.