Join us
Daily Top 2Weekly Top 5

फोर्ब्स इंडियाच्या यादीत समावेश झाला या मराठमोळ्या जोडीचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2019 17:58 IST

फोर्ब्स इंडियाने सर्वाधिक लोकप्रिय आणि प्रसिद्धी मिळवणाऱ्या 100 सेलिब्रीटींची यादी नुकतीच जाहीर केली आहे.

ठळक मुद्देया यादीत अजय-अतुलची जोडी 22 व्या क्रमांकावर असून या जोडीची वार्षिक कमाई 77.91 कोटी आहे.

फोर्ब्स इंडियाने सर्वाधिक लोकप्रिय आणि प्रसिद्धी मिळवणाऱ्या 100 सेलिब्रीटींची यादी नुकतीच जाहीर केली आहे. या यादीत बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटींच्या नावाचा समावेश आहे. पण पहिल्यांदाच या यादीत एका मराठमोळ्या संगीतकाराच्या जोडीची वर्णी लावली आहे. हे संगीतकार दुसरे कोणीही नसून मराठी आणि बॉलिवूडमधील प्रसिद्ध संगीतकार अजय-अतुल आहेत. या यादीत ही जोडी 22 व्या क्रमांकावर असून या जोडीची वार्षिक कमाई 77.91 कोटी आहे.

सैराट झालं जी, अप्सरा आली, वाट दिसू दे, माऊली माऊली, खेळ मांडला... ही गाणी आठवली की, हमखास आठवते ते अजय-अतुल यांचे नाव. आपल्या दमदार आवाजाने मराठी सिनेसृष्टी गाजवणाऱ्या या जोडीने हिंदीतही यशाची पताका फडकावली आहे.

घरी संगीताचे कुठलेही वातावरण नसताना अगदी शून्यातून सुरूवात करणाऱ्या अजय-अतुल या भावांनी मोठे साम्राज्य निर्माण केले आहे. अजय-अतुल यांचे वडील महसूल खात्यात नोकरीला होते. त्यामुळे त्यांची सतत बदली होत असे. त्यामुळे अजय-अतुल पश्चिम महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या गावात लहानाचे मोठे झाले. याकाळात ग्रामीण संस्कृती, लोकसंस्कृती, बोली भाषा, या भाषांची विशिष्ट शैली हे सगळे बारकावे त्यांना शिकता आले. शाळेच्या दिवसांत अभ्यासापेक्षा गाणी-नृत्य बसवणे, बँड पथकात भाग घेणे यातच ते अधिक मग्न असत.

‘अगंबाई अरेच्चा’, ‘जोगवा’ या मराठी चित्रपटांनी अजय-अतुल या जोडीला प्रसिद्धी मिळाली. पुढे ‘सैराट’ मधील गाण्यांनी लोकप्रियतेचा उच्चांक गाठला आणि अजय-अतुल जोडीला लोकांनी डोक्यावर घेतले. बॉलिवूडनेही या जोडीची दखल घेतली. लाईफ हो तो ऐसी, विरूद्ध, गायब, सिंघम, अग्निपथ, बोल बच्चन अशा हिंदी चित्रपटांना त्यांनी संगीत दिले. ‘सैराट’चा हिंदी रिमेक ‘धडक’ या सिनेमालाही याच जोडीने संगीत दिले. या जोडीने राष्ट्रीय पुरस्कारावरही नाव कोरले.

फोर्ब्स इंडियाच्या यादीत पहिल्या स्थानावर भारतीय कर्णधार विराट कोहली आहे. कोहलीची वार्षिक कमाई 252.72 कोटी आहे. तर दुसऱ्या स्थानावर अभिनेता अक्षय कुमारने स्थान मिळवले आहे. अक्षयची वार्षिक कमाई 293.25 कोटी रुपये आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर अभिनेता सलमान खान आहे. सलमानची वार्षिक कमाई 229.25 कोटी रुपये आहे.

टॅग्स :अजय-अतुलफोर्ब्स