मुक्ता बर्वे सांगतेय ‘हृदयांतर’मुळे ‘आई’पण काय असते ते कळले
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2017 09:49 IST
अभिनेत्री मुक्ता बर्वेने गेल्या दशकभरामध्ये आपल्या वैविध्यपूर्ण भूमिकांमधून नाट्य-सिने रसिकांच्या मनात स्थान मिळवले आहे. जोगवा, मुंबई-पुणे-मुंबई यांसारखे तिचे चित्रपट ...
मुक्ता बर्वे सांगतेय ‘हृदयांतर’मुळे ‘आई’पण काय असते ते कळले
अभिनेत्री मुक्ता बर्वेने गेल्या दशकभरामध्ये आपल्या वैविध्यपूर्ण भूमिकांमधून नाट्य-सिने रसिकांच्या मनात स्थान मिळवले आहे. जोगवा, मुंबई-पुणे-मुंबई यांसारखे तिचे चित्रपट तर प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले. आता ती लवकरच हृदयांतर चित्रपटात झळकणार असून या चित्रपटाचे दिग्दर्शन विक्रम फडणीस करणार आहेत. या चित्रपटात ती समायरा जोशी ही भूमिका साकारणार आहे. समायरा ही अतिश सशक्त भूमिका असून मुक्ता पहिल्यांदाच दोन मुलींच्या आईची भूमिका साकारत आहे.‘हृदयांतर’ या चित्रपटाचे आंतरराष्ट्रीय मातृ दिनाच्या निमित्ताने नुकतेच एक पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. या पोस्टरमध्ये मुक्ता आणि या सिनेमातल्या तिच्या दोन गोंडस मुली पाऊटिंग करताना दिसत आहेत. या पोझमधून ‘आई मुलीची जीवाभावाची मैत्रीण’ असल्याचेच अधोरेखित केले गेलेय. मुक्ता याविषयी सांगते, “गेल्यावर्षी आलेल्या ‘वायझेड’ सिनेमात जरी मी आईच्या भूमिकेत दिसले असले तरी ही भूमिका खूपच छोटी होती. त्यामुळे या भूमिकेद्वारे मला आईपण अनुभवता आले नव्हते. या चित्रपटातील माझी भूमिका केवळ पाच मिनिटांचीच होती. मला खऱ्या अर्थाने आईपण समजून ते व्यक्त करण्याची संधी ‘हृदयांतर’मधल्या समायरा जोशी या भूमिकेने दिली. माझ्या आईने आजपर्यंत माझ्यासाठी नक्की किती केलं आणि किती सोसलं त्याची जाणीव मला या भूमिकेमूळे झाली.”मुक्ता बर्वेची आई ‘हिरोइनची आई’ या गटात मोडणारी नाही. ती मुक्ताची खरी समीक्षक आहे. त्यामुळे हृदयांतर या चित्रपटात दोन मुलींच्या आईची भूमिका साकारल्यानंतर मुक्ताला आपल्या आईची प्रतिक्रिया जाणून घ्यायची उत्सुकता होती. मुक्ता सांगते, “विक्रमने जेव्हा मला आणि माझ्या आईला चित्रपटाचा फस्ट कट दाखवला, तेव्हा सिनेमा संपल्यावर आई पाच मिनिटे काहीच बोलली नाही. पाच मिनिटांनी आई विक्रमकडे जाऊन म्हणाली, तुझ्या सिनेमाने मी नि:शब्द झाले. आईची ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूपच महत्त्वाची आहे. ही प्रतिक्रिया मला आत्मविश्वास देऊन गेली.”