ती सध्या काय करते चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2016 13:14 IST
सतीश राजवाडे दिग्दर्शित ती सध्या काय करते या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच सोशलमीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटाची चर्चा गेल्या कित्येक दिवसांपासून रंगत आहे. कारण या चित्रपटाच्या माध्यमातून लक्ष्मीकांत यांचा मुलगा अभिनय बेर्डे हा चित्रपटसृष्टीत पदापर्ण करणार आहे. तसेच त्याच्यासोबत या चित्रपटात आर्या आंबेकरदेखील झळकणार आहे.
ती सध्या काय करते चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित
सतीश राजवाडे दिग्दर्शित ती सध्या काय करते या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच सोशलमीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटाची चर्चा गेल्या कित्येक दिवसांपासून रंगत आहे. कारण या चित्रपटाच्या माध्यमातून लक्ष्मीकांत यांचा मुलगा अभिनय बेर्डे हा चित्रपटसृष्टीत पदापर्ण करणार आहे. तसेच त्याच्यासोबत या चित्रपटात आर्या आंबेकरदेखील झळकणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना ती सध्या काय करते या चित्रपटात या दोघांची हटके अशी जोडी पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर या चित्रपटात प्रेक्षकांचे लाडके कलाकार अंकुश चौधरी आणि तेजश्री प्रधान या कलाकारांचादेखील समावेश आहे. प्रत्येकाच्या पहिल्या प्रेमाची ही कथा असणार आहे. मात्र या चित्रपटात प्रेक्षकांना अनुराग आणि तन्वीच्या प्रेमकथेचे तीन टप्पे अनुभवायला मिळणार आहे. त्याचप्रमाणे या चित्रपटातील गाणीदेखील प्रेक्षकांच्या मनावर राज्य करताना दिसत आहे. सध्या या चित्रपटातील ह्दयात वाजे समथिंग हे गाणे खूपच प्र्रेक्षकांच्या पसंतीस पडत असल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच या चित्रपटात हृदित्य राजवाडे, सुकन्या कुलकर्णी-मोने, संजय मोने, अनुराधा राजाध्यक्ष, प्रसाद बर्वे आणि तुषार दळवी या कलाकारांच्यादेखील महत्वाच्या भूमिका आहेत. झी स्टुडियोजचे निखिल साने आणि असंख्य प्रॉडक्शनच्या पल्लवी राजवाडे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटाची कथा या चित्रपटाचे दिग्दर्शक सतीश राजवाडे यांची असून पटकथा आणि संवाद मनस्विनी लता रवींद्र यांचे आहेत. संकलन राहुल भाटणकर यांनी केले आहे. सुहास गुजराथी यांचं छायाआरेखन आहे. हा चित्रपट ६ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.