Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘मी बाप्पा बोलतोय’ लघुपट लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2020 17:58 IST

साडेआठ मिनिटांच्या या लघुपटाच्या माध्यमातून सामजिक संदेश देताना बाप्पांच्या  वेगवेगळ्या रूपाचे दर्शन घडणार आहे.

सध्या सगळ्यांना वेध लागलेत ते गणरायाच्या आगमनाचे. बाप्पाच्या स्वागतासाठी आतुर असणाऱ्या गणेशभक्तांना  यंदाच्या गणेशोत्सवात खास बाप्पावर असलेल्या एका लघुपटाची मेजवानी मिळणार आहे. भावेश प्रोडक्शन्सची निर्मिती असलेला ‘मी बाप्पा बोलतोय’ हा लघुपट १६ ऑगस्टला ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिग्दर्शक भावेश पाटील यांनी या लघुपटाचे दिग्दर्शन केले आहे. याआधी ‘रहस्य’ या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शन त्यांनी केले होते.

‘मी बाप्पा बोलतोय’ या लघुपटाचे चित्रीकरण नंदुरबार मध्ये झाले आहे. साडेआठ मिनिटांच्या या लघुपटाच्या माध्यमातून सामजिक संदेश देताना बाप्पांच्या  वेगवेगळ्या रूपाचे दर्शन घडणार आहे. बाप्पाचे हे रूप प्रत्येकाला नक्कीच काहीतरी शिकवून जाईल असा विश्वास दिग्दर्शक भावेश पाटील व्यक्त करतात.

‘मी बाप्पा बोलतोय’ लघुपटाची कथा-पटकथा-दिग्दर्शन भावेश पाटील यांचे आहे. संवाद समीर नेरलेकर यांचे आहेत. राहुल, ईशी यांच्या अभिनयाचे रंग यात पहायला मिळणार आहेत. मनोज मराठे यांचे छायांकन लघुपटाला लाभले आहे. विजय माळी, निशिकांत वळवी, गिरीश सूर्यवंशी यांनी निर्मिती व्यवस्थापनाचे काम सांभाळले आहे. या लघुपटाव्यतिरिक्त भावेश प्रोडक्शन्सचे दोन आगामी मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

टॅग्स :गणपती