Join us
Daily Top 2Weekly Top 5

'शेपटीवाल्या प्राण्यांची भरली आहे सभा!', बिबट्यानंतर सिद्धार्थच्या इमारतीच्या आवारात दिसला आणखी एक नवा प्राणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2021 21:26 IST

सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर यांनी सोशल मीडियावर शेअर केलेले फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर ही मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडीने सोशल मीडियावर नुकतेच शेअर केलेल्या फोटो सध्या व्हायरल होताना दिसत आहेत. खरेतर नेहमी स्वतःचे फोटो शेअर करणाऱ्या या जोडप्यांनी मात्र यावेळी वेगळे फोटो शेअर केले आहेत. 

सिद्धार्थ आणि मिताली गोरेगाव पूर्व येथील म्हाडा कॉलनीत राहतात. त्यांच्या इमारतीच्या मागे आरेचे जंगल लागते. त्यामुळे या परिसरात क्वचित जंगलातील प्राणी पहायला मिळतात. आज तर चक्क त्यांना त्यांच्या घरातील खिडकीतून सर्वात आधी बिबट्या आणि नंतर झाडीतून डोकावणारा हरीण दिसले. सिमेंट कॉक्रिंटच्या या मुंबई शहरात असे प्राणी पहायला मिळत नाहीत. त्यामुळे त्यांच्या सोशल मीडियावरील या प्राण्यांचे फोटो पाहून सगळेच अवाक झाले आहेत.

सिद्धार्थ चांदेकरने सर्वात आधी बिबट्या दिसल्यानंतर तो क्षण कॅमेऱ्यात टिपला आणि इंस्टाग्रामवर शेअर करत म्हटले की, आमच्या बिल्डिंगच्या मागे आज एक पाहुणा आला होता. बराच वेळ आमच्याकडे टक लावून बघत बसला आणि झुडपात निघून गेला. त्याच्या चेहऱ्यावर एक जखम दिसली. "तुमच्यामुळे झालंय हे" असं नजरेतून सांगत होता. बिल्डिंग मधले सगळे फोटो काढायला खिडकीत आले. मी पण आलो. तो फक्त स्थिर नजरेनं बघत होता आमच्याकडे. त्याचा नजरेतून कळत होतं स्पष्ट की पाहुणा तो नाही, आम्ही आहोत. हे त्याचं घर आहे.

तर मिताली मयेकरने देखील इंस्टाग्रामवर बिबट्याचा कठड्यावर बसलेला फोटो शेअर करत लिहिले की, पाहुणा कोण? मी? की तुम्ही??

त्यानंतर काही वेळानंतर सिद्धार्थ आणि मितालीने हरीणचा फोटो शेअर केला. या फोटोत तो हरीण झाडातून डोकावताना दिसतो आहे.  सिद्धार्थने हा फोटो शेअर करत लिहिले की, पिंजऱ्यात मी होतो. अडकलेलो. तो मोकळा फिरत होता सगळीकडे. अजून एक..

तर मितालीने फोटो शेअर करत लिहिले की, आज आमच्याकडे शेपटीवाल्या प्राण्यांची भरली आहे सभा!

टॅग्स :सिद्धार्थ चांदेकरमिताली मयेकर