आपल्या नृत्यातील दिलखेचक अदांनी व अभिनय कौशल्याने रसिकांना भुरळ पाडणारी अभिनेत्री मीरा जोशी लवकरच वेगळ्या अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नेमकी ती कोणत्या गाण्यात किंवा चित्रपटात दिसणार आहे, हे जाणून घेण्यासाठी तुम्ही उत्सुक असाल ना... मीरा 'वृत्ती' नामक मराठी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही माहिती खुद्द तिनेच सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांना दिली आहे.
मीराने इंस्टाग्रामवर आगामी चित्रपट 'वृत्ती'मधील फोटो शेअर करीत या चित्रपटाबाबत सांगितले आहे. या चित्रपटात ती अंजलीची भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण उसरणी येथे पार पडले आहे.
या चित्रपटाबाबत मीराने सांगितले की, ''वृत्ती' चित्रपटात मी अंजली नामक प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. यात माझ्यासोबत अभिनेता अनुराग वरळीकर दिसणार आहे. यात मालवणी टच असणार आहे. मला मालवणी येत नाही. त्यासाठी आमचे वर्कशॉप झाले. '
'वृत्ती' चित्रपटाची कथा एका गावात दोन दिवसात घडणाऱ्या गोष्टींवर आधारीत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन एस. अश्विन यांनी केले आहे. या चित्रपटातून त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे. सध्या या चित्रपटाचे पोस्ट प्रोडक्शनचे काम सुरू असून लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.