Join us
Daily Top 2Weekly Top 5

पतीच्या आत्महत्येच्या धक्क्यातून सावरतेय मयुरी देशमुख, अशारितीने करतेय नवीन सुरूवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2020 19:28 IST

मयुरी देशमुखचा नवरा आशुतोषच्या आत्महत्येनंतर सर्वांनाच धक्का बसला होता आणि आता मयुरी या धक्क्यातून हळूहळू सावरते आहे.

'खुलता कळी खुलेना' या मालिकेतून प्रेक्षकांच्या घरातघरात पोहोचलेली अभिनेत्री मयुरी देशमुखच्या नवऱ्याने काही दिवसांपूर्वी राहत्या घरातच गळफास लावून आत्महत्या केली होती. आशुतोष भाकरेने नैराश्यातून आपले जीवन संपवल्याची माहिती त्यानंतर पुढे आली होती. आशुतोषच्या या पाऊलामुळे त्याच्या घरातील सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. आता मयुरी या धक्क्यातून हळूहळू सावरते आहे. तिने आपल्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करीत चाहत्यांना एक चांगली बातमी दिली आहे. तिने आपल्या इन्स्टाग्रामवर नव्या मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे.

स्टार प्लस वाहिनीवर इमली नामक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे. या मालिकेत मयुरी देशमुख मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या मालिकेच्या निमित्ताने मयुरी अभिनेता गश्मीर महाजनीसोबत दिसणार आहे. या मालिकेचा प्रोमो शेअर करताना मयुरीने एक भावनिक पोस्टही लिहिली आहे. तिने मालिकेचा प्रोमो शेअर करत लिहिले की, हळूहळू मी दु:खातून सावरत आहे. तुम्ही माझ्यासाठी व माझ्या कुटुंबासाठी केलेल्या प्रार्थनेमुळे आम्हाला बळ मिळाले आहे. तुम्ही दिलेल्या प्रेमातून मला नवे करण्याची ऊर्जा मिळते. पुन्हा एकदा तुमच्या सोबतीची गरज आहे. मी नवीन सुरूवात करीत आहे.

मयुरीचा पती आशुतोष भाकरेने 'इचार ठरला पक्का' आणि 'भाकर' या चित्रपटांमध्ये काम केले होते. २० जानेवारी २०१६ रोजी आशुतोष आणि मयुरीचा विवाह झाला होता. लॉकडाऊनमध्ये नांदेडच्या घरी असताना आशुतोषने आत्महत्या केली.

अभिनेत्री मयुरी देशमुखने अनेक मालिका, चित्रपट आणि नाटकांमध्ये काम केले आहे. 'खुलता कळी खुलेना' या मालिकेतून ती घराघरात पोहचली.  '३१ दिवस' आणि 'डॉ. प्रकाश बाबा आमटे' या चित्रपटात मयुरीने काम केले आहे. तसेच 'डिअर आजो', 'तिसरे बादशाह हम' या नाटकांमध्येही तिने काम केले आहे.

टॅग्स :मयुरी देशमुख