Join us

मराठमोळी अभिनेत्री अमृता सुभाषच्या लग्नाला १८ वर्षे पूर्ण, तिचा नवरादेखील आहे प्रसिद्ध अभिनेता

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2021 15:53 IST

अमृता सुभाष अभिनेत्रीशिवाय एक लेखिका, गायिका आणि संगीतकारदेखील आहे.

अभिनेत्री अमृता सुभाषने फक्त मराठीतच नाही तर बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर आपली छाप उमटविली आहे. अमृता सुभाष अभिनेत्रीशिवाय एक लेखिका, गायिका आणि संगीतकारदेखील आहे. अमृता सुभाषचा नवरा संदेश कुलकर्णी देखील प्रसिद्ध अभिनेता आहे. अमृता आणि संदेश यांच्या लग्नाला नुकतेच १८ वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने अमृता सुभाषने संदेश कुलकर्णीसोबतचे फोटो शेअर करत लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

अमृता सुभाषने फोटो शेअर करत लिहिले की, आज आम्ही १८ वर्षांचे झालो. १८वर्ष हसण्यारडण्या भांडण्याची..पण काही झालं तरी एकमेकांचे हात न सोडण्याची. अमृताच्या या पोस्टवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे. 

अमृता सुभाषचा नवरा संदेश कुलकर्णी लेखक, अभिनेता आणि दिग्दर्शक आहे. संदेश हा अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा सख्खा भाऊ आहे. संदेश आणि अमृताने एकत्र कामदेखील केले आहे.

अमृता ही प्रसिद्ध अभिनेत्री ज्योती सुभाष यांची मुलगी आहे. तिचे शिक्षण दिल्ली येथील नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये झाले आहे. तिने हिंदी आणि मराठी भाषांच्या नाटकात काम केले. तिचे ‘ती फुलराणी’ हे नाटक खूप गाजले होते. २००४ साली तिने ‘श्वास’ या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत एन्ट्री केली.

अमृता ही एक प्रशिक्षित शास्त्रीय गायिका देखील आहे. २०१२ साली तिने मराठी ‘सा रे ग म प’ या रिअ‍ॅलिटी शोच्या सेलिब्रिटी पर्वात सहभाग घेतला होता. अमृता सुभाष ही उत्तम लेखिका असून तिचे २०१४ साली ‘एक उलट एक सुलट’ हे पुस्तक प्रकाशित झाले.

टॅग्स :अमृता सुभाषसोनाली कुलकर्णी