Join us
Daily Top 2Weekly Top 5

आधी फीमुळे सोडलं शिक्षण, आता वयाच्या ४६ व्या वर्षी विजू माने यांनी IIT दिल्लीमध्ये घेतला प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2026 10:04 IST

वयाच्या ४६ व्या वर्षी विजू माने आयआयटी दिल्लीमध्ये घेत आहेत शिक्षण, पोस्ट शेअर करत म्हणाले...

Viju Mane : मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय दिग्दर्शकांपैकी एक असणारे दिग्दर्शक म्हणजे विजू माने. बालनाट्यापासून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या विजू यांनी  गंभीर, विनोदी अशा वेगवेगळ्या धाटणीच्या चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे. 'पांडू', 'शर्यत', 'बायोस्कोप' यांसारखे चित्रपट त्यांनी सिनेसृष्टीला दिले.  विजू माने सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहेत. वयाच्या ४६ व्या वर्षी त्यांनी पुन्हा विद्यार्थीदशेत परतले आहेत. वयाच्या ४६ व्या वर्षी त्यांनी देशातील अत्यंत प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या आयआयटी दिल्ली (IIT Delhi) मध्ये प्रवेश मिळवला आहे. त्यांच्या या जिद्दीचे कौतुक सर्वस्तरातून होत आहे. 

विजू माने यांनी सोशल मीडियावर एक सविस्तर पोस्ट शेअर करत आपला हा प्रवास आणि जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. विजू माने यांनी आयआयटी दिल्लीतून 'व्हर्च्युअल रिॲलिटी (VR) आणि ऑगमेंटेड रिॲलिटी (AR)' या विषयातील सर्टिफिकेट कोर्ससाठी प्रवेश घेतला आहे. याबद्दल सांगताना ते म्हणतात, "माने म्हणे IIT यन झाले? ज्याआयआयटी दिल्ली जी देशातील सर्वात प्रतिष्ठित संस्था आहे तिथून शिक्षण घेणं हे ज्या वयात स्वप्न होतं त्या वयात ते पूर्ण करता आले नाही, पण म्हणून स्वप्नांच्या मागे धावायचं नाही असं नाही. येत्या काळात मनोरंजनासाठी  'व्हर्च्युअल रिॲलिटी (VR) आणि ऑगमेंटेड रिॲलिटी (AR)'  हे तंत्रज्ञान अविभाज्य असणार आहे, म्हणून ते शिकावं असं वाटलं".

आयआयटीमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी विजू माने यांना आपल्या पदवीचे (Degree) प्रमाणपत्र सादर करायचे होते. मात्र, अनेक वर्षांपासून दुर्लक्षित असलेल्या या कागदपत्राचा शोध घेताना त्यांची चांगलीच फजिती झाली. "डिग्री सर्टिफिकेट शोधताना इतका त्रास झाला की त्यापेक्षा पुन्हा एकदा कॉलेजला जाऊन शिकून पदवी मिळवली असती तरी परवडलं असतं. शेवटी ते शोधण्यासाठी मला थेट माझ्या कॉलेजपर्यंत जावं लागलं", असं त्यांनी मिश्किलपणे नमूद केलं.

विजू माने यांनी आपल्या पोस्टमध्ये जुन्या दिवसांची आठवणही करून दिली. बीएससी पूर्ण झाल्यावर त्यांना जमनालाल बजाज सारख्या नामवंत संस्थेतून एमबीए करायचे होते, पण तेव्हा महाविद्यालयाची फी ऐकून त्यांना माघार घ्यावी लागली होती. "तेव्हा परिस्थितीच्या विद्यापीठातच पुढचं शिक्षण होत राहिलं. पण आज वयाच्या ४६ व्या वर्षी विद्यार्थी म्हणून आयआयटीत पाय ठेवतानाचा आनंद वेगळाच आहे", अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

"प्रोजेक्ट सबमिट करायचा आहे..."सध्या विजू माने त्यांच्या या कोर्सच्या शेवटच्या टप्प्यावर असून त्यांना आपला प्रोजेक्ट सबमिट करायचा आहे. "माझी परीक्षा घेण्याची जीवनाची हौस फिटत नाहीये आणि माझाही वेगवेगळ्या परीक्षा देऊन पास होण्याचा किडा काही शांत बसत नाहीये. आता खरंच परीक्षेची वेळ आली आहे. प्रोजेक्ट सबमिट करायचं आहे. तुमच्या शुभेच्छा असतीलच पण मेहनत मलाच करायची आहे" असं त्यांनी पोस्टच्या शेवटी म्हटलं.  

English
हिंदी सारांश
Web Title : Left Education Due to Fees, Viju Mane Joins IIT Delhi at 46

Web Summary : Director Viju Mane, after facing financial constraints in his youth, has enrolled in IIT Delhi at 46 for a VR/AR certificate course. He aims to leverage this technology for entertainment. Finding his degree was a challenge, but he's now focused on submitting his project.
टॅग्स :विजू मानेसेलिब्रिटीशिक्षण