लोकल ही मुंबईची लाइफलाइन आहे असं म्हटलं जातं. रोज लाखो प्रवासी मुंबई आणि उपनगरांतून लोकलने प्रवास करत असतात. लोकलच्या रोजच्या गर्दीचे अनेक व्हिडिओही व्हायरल होत असतात. लोकलची ही गर्दी आता मुंबईकरांसाठीदेखील काही नवीन नाही. पण, या जीवघेण्या गर्दीवर मराठी दिग्दर्शकाने संताप व्यक्त केला आहे. मुंबईचं स्पिरिट म्हणून पाहिल्या जाणाऱ्या लोकलच्या गर्दीवर दिग्दर्शकाने गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
मराठी दिग्दर्शक अक्षय इंडीकरने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये लोकलमधील महिला डब्याची गर्दी दिसत आहे. या व्हिडिओला "पायी फुफाटा" हे गाणंही देण्यात आलं आहे. महिला दिनानिम्मित शेअर करण्यात आलेल हा व्हिडिओ पाहून मात्र अक्षय संतापला आहे. “अशीच गाणी लावून गर्दीचं, ढिसाळ नियोजनाचं, टॅक्सच्या पैशांवर राजकारणी लोकांच्या तुंबड्या भरण्याचं, चांगली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था देण्याविषयी नाही बोलायचं. मुंबईच्या अवाढव्य हाताबाहेर गेलेल्या सार्वजनिक व्यवस्थेला प्रश्न विचारायचे सोडून उदात्तीकरण करायचे. निव्वळ बायकाच काय पुरुषही जीवावर उदार होऊन लोंबकळत प्रवास करतात. मुद्दा सरकारला जाब विचारण्याचा आहे. बाकी गाणी लावून रील बनवणं ठीकच”, असं त्याने पोस्टमध्ये म्हटलं आहे.
तर दुसऱ्या स्टोरीमध्ये अक्षयने “हात सटकला की खेळ खल्लास”, असे म्हणत, “रेल्वे प्रशासनाला गर्दीच्या वेळेत ऑफिसच्या, सकाळच्या आणि संध्याकाळच्या वेळेत सगळ्यांना नीट निदान गाडीत उभं राहता येईल. सर्कशीसारखं लोंबकळत आत्ता मरतो का हात सटकलं की खेळ खल्लास...असल्या किड्या-मुंगीच्या जगण्यावर रेल्वेला विचारलं पाहिजे ना? की हेही लोंबकळत जाणं त्याचं उदात्तीकरण करणार? त्याला ग्रेट म्हणणार? मुंबई स्पिरिट?” असं प्रश्न विचारले आहेत.