Kranti Redkar: मराठी सिनेसृष्टीतील एक नावाजलेली अभिनेत्री म्हणून क्रांती रेडकरकडे (Kranti Redkar) पाहिलं जातं. 'कोंबडी पळाली' या गाण्याचे स्वर कानावर पडताच अगदीच डोळ्यासमोर क्रांती रेडकरचा चेहरा उभा राहतो. दरम्यान, क्रांती आपल्या अभिनयाबरोबरच घरची जबाबदारी देखील तितकीच उत्तम पद्धतीने सांभाळते. अशातच अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये अभिनेत्रीने फेमिनिझमवर भाष्य केलं आहे. मुलाखतीमधील तिच्या वक्तव्याने सगळ्यांचं लक्ष वेधलंय.
अलिकडेच मातृदिनानिमित्त क्रांती रेडकर आणि आईने लोकमत फिल्मी ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये अभिनेत्रीने स्त्रीवादावर स्पष्टपणे भाष्य केलं आहे. त्यादरम्यान ती म्हणाली, मुळात आई वर्किंग वुमन असल्यामुळे बाईने काम करु नये. किंवा बाईने घर चालवावं, फक्त घराकडे लक्ष द्यावं असं संस्कार माझ्यावर झालेले नाहीत. खरंतर माझी आई वर्किंग वूमन होती, माझ्या सासूबाई देखील बिजनेस सांभाळतात त्यामुळे लग्नानंतरही काम करत राहायचं हे मी शिकले. ते सगळं आता झालं. बऱ्याचदा आम्ही बाहेर जातो तेव्हा मी गाडी चालवते आणि समीर बाजूला बसलेले असतात, ते कधीही असं म्हणत नाहीत की, ' मी पुरुष आहे तू बाजूला बस'. ते सगळं झालं, आता नाही. आई वर्किंग वूमन असल्याने माझा सांभाळ प्रोग्रेसीव वूमनने केलाय. त्यामुळे मला आता माझ्या दोन्ही मुलींना मोठं करताना त्यांच्यावर कसे संस्कार केले पाहिजेत हे गरजेचं आहे. आपण आपली संस्कृती, संस्कार जपले पाहिजेत."
पुढे अभिनेत्री म्हणाली, "तुम्ही आत्मनिर्भर असला तरी तुमची फेमिनिझमची व्याख्या स्पष्ट असली पाहिजे. पुरुषांना कमी लेखणं म्हणजे फेमिनिझम नाही. एक स्त्री म्हणून तुम्ही या जगात तरु शकता यावर तुमचं फेमिनिझम ठरलेलं असतं, असं मला वाटतं." असं म्हणत अभिनेत्री क्रांती रेडकर हिने फेमिनिझमवर हे स्पष्ट मत व्यक्त केलं आहे.