Join us

"लग्न करण्यापेक्षा ते टिकवणं आणि निभावणं...", अभिनेता सुशांत शेलारने सांगितलं सुखी संसाराचं गुपित

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2025 18:41 IST

सुशांत शेलार (Sushant Shelar) हा मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे.

Sushant Shelar: सुशांत शेलार (Sushant Shelar) हा मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. दुनियादारी, क्लासमेट्स, मॅटर, खारी बिस्किट आणि धर्मवीर यांसारख्या गाजलेले चित्रपट तसेच मालिकांमधून त्याने काम केलं आहे. अभिनय आणि राजकारण या दोन्ही क्षेत्रांमध्ये स्वतःची ओळख निर्माण करणारा अभिनेता सुशांत शेलार सध्या चर्चेत आलाय. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये अभिनेत्याने लग्न संस्कृतीवर भाष्य केलं आहे.

नुकतीच सुशांत शेलार आणि त्याची पत्नी साक्षीने 'लोकमत फिल्मी'ला मुलाखत दिली. त्यादरम्यान, अभिनेत्याला सुखी संसारासाठी प्रेक्षकांना काय टिप्स द्याल. असा प्रश्न विचारण्यात आला. याबद्दल बोलताना सुशांत शेलार म्हणाला, "मला असं वाटत ना सध्याच्या काळामध्ये जे आपण बघतोय की लोकं खूप स्वतंत्र झाली आहेत. तसंच छोट्या-छोट्या गोष्टींवरती वाद होतात त्यांचा अहंकार दुखावतो आणि ते अहंकार दुखावल्याने लगेचच हे प्रकरण घटस्फोटापर्यंत जातं. म्हणजे इतकी आपली संस्कृती ही तकलादू नाहीये. म्हणून मला असं वाटतं की लग्न करतानाच हजार वेळा विचार करा. कारण दोन कुटुंब त्यानिमित्ताने जोडले जातात."

पुढे सुशांत शेलारने म्हटलं, "तुम्ही जेव्हा वेगळे होता तेव्हा फक्त तुम्ही वेगळे होत नाहीत तर दोन कुटुंब वेगळी होतात. म्हणून मला असं वाटतं की लग्न हे तुमचा अहंकार बाजूला ठेवून त्याचा विचार करा आणि तुमचा अहंकार आड येणार असेल तर कृपया त्या भानगडीत तुम्ही पडू नका. कारण काय होतं की, कुठेतरी ना माघार घ्यावी लागते. चूक ही माणसाकडूनही होते. माझ्याकडून सुद्धा झाली असेल.पण तेव्हा कुठे कुठे जेव्हा आपल्याला त्या चूकीची जाणीव होणं, माफी मागणं याच्यात कमीपणाचं नसतं. म्हणून लग्न करण्यापेक्षा लग्न टिकवणं हे आणि निभावणं आणि ती जबाबदारी स्वीकारणं आणि ती पेलणं आणि ती पार पाडणं ही जास्त महत्वाची आहे."

टॅग्स :मराठी अभिनेतासेलिब्रिटी