Pravin Tarde Post: मैत्री आणि आत्मशोधाचा अर्थ उलगडून भावनिक प्रवास घडवून आणणारा बंजारा हा चित्रपट येत्या १६ मे या दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सिक्कीमच्या निसर्गरम्य पार्श्वभूमीवर चित्रित झालेल्या ‘बंजारा’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून त्याला प्रेक्षकांची पसंती मिळताना दिसते आहे. त्यामुळे हा चित्रपट पाहण्यासाठी सिनेरसिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. या भरत जाधव (Bharat Jadhav) , शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) आणि सुनील बर्वे (Sunil Barve) यांच्या अभिनयाची जुगलबंदी बघायला मिळतेय. दरम्यान, या सिनेमाच्या माध्यमातून शरद पोंक्षे यांचा लेक अभिनय आणि दिग्दर्शनात पदार्पण करतोय. तीन मित्रांच्या मैत्रीची अनोखी कहाणी सांगणारा ‘बंजारा’ सिनेमा पाहण्याची सर्वांना उत्सुकता आहे.अशातच मराठी अभिनेते प्रवीण तरडे या चित्रपटाबद्दल सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टद्वारे त्यांनी स्नेह पोंक्षेचं तोंडभरुन कौतुक केलंय.
प्रवीण तरडे यांनी आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर अगदी मोजक्याच शब्दात बंजारा बद्दल लिहून आपलं मत व्यक्त केलं आहे. त्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलंय, "स्नेह शरद पोंक्षे मित्रा हा तुझा लेखक दिग्दर्शक म्हणुन पहिलाच सिनेमा आहे.. तो ही ईतका अवघड कारण मराठीत पहिल्यांदाच असं काहीतरी होतंय.. एकापेक्षा एक तगडे कलाकार आणि नेत्रदीपक लडाख चं सौंदर्य बघायला प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.. असे सिनेमे चाललेच पाहीजेत कारण काहीतरी नवीन घेऊन नव्या दमाचा लेखक दिग्दर्शक येतोय. येत्या १६ मे पासून जवळच्या चित्रपटगृहात नक्की बघा...", अशा आशयाची पोस्ट त्यांनी लिहिली आहे.
दरम्यान, मोरया प्रॉडक्शन्स प्रस्तुत या चित्रपटाचे लेखन, संवाद आणि दिग्दर्शन स्नेह पोंक्षे यांचे आहे. प्रमुख भूमिकांमध्ये शरद पोंक्षे, भरत जाधव, सुनील बर्वे, स्नेह पोंक्षे, सक्षम कुलकर्णी आणि आदित्य धनराज झळकणार असून, निर्मिती रोहिणी विजयसिंह पटवर्धन आहे. शरद पोंक्षे प्रस्तुत हा चित्रपट येत्या १६ मे रोजी प्रदर्शित होत आहे.