Prasad Oak: मराठी वर्षातील अनन्य साधारण महत्त्व असलेला श्रावण महिना सुरू झाला आहे. श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवाराला विशेष महत्त्व आहे. हा दिवस भगवान शंकराला समर्पित आहे आणि भक्त मोठ्या श्रजद्धेने या दिवशी उपवास पूजा करतात. दरम्यान, श्रावणी सोमवारच्या पहिल्याच दिवशी मराठी अभिनेता प्रसाद ओक आणि पत्नी मंजिरी ओक यांनी नाशिकमधीलत्र्यंबकेश्वर येथील मंदिरात जाऊन ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतलं आहे. शिवाय या दिवसाचं औचित्य साधून त्यांनी खास संकल्प देखील केला आहे.
नुकताच प्रसाद ओकने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर त्र्यंबकेश्वर मंदिरातील खास व्हिडीओ शेअर केला आहे. "गोदावरीतटी एका ठायी नांदताती तिघे, ब्रह्मा विष्णु महेश वैकुंठ चतुर्दशी त्रिपुरी पौर्णिमा आणि महाशिवरात्रीस, भक्त लोटती भावे भजती त्रिनेत्र ज्योतिर्लिंगास, त्र्यंबकेश्वर महती जगती वर्णावी किती, तिथे नांदे शंभू कैलासाचा पती...; ज्योतिर्लिंग यात्रा सुरुवात (त्रंबकेश्वर), पहिला श्रावणी सोमवार... ", असं कॅप्शन देत प्रसाद-मंजिरीने महादेवाच्या दर्शनाचा व्हिडीओ शेअर केला आहे. त्याचबरोबर त्यांनी या पोस्टमध्ये #त्र्यंबकेश्वर, #त्र्यंबकेश्वरज्योतिर्लिंग, #ज्योतिर्लिंगयात्रा, #गोदावरीतट, #हरहरमहादेव, #ॐनमःशिवाय, #शिवआराधना, #तीर्थयात्रा, #धार्मिकयात्रा,#माझी ज्योतिर्लिंगयात्रा...; असे हॅशटॅगही वापरले आहेत. त्यांच्या या व्हिडीओला नेटकऱ्यांची पसंती मिळताना दिसते आहे. दरम्यान, श्रावण सोमवारचा मुहूर्त साधत प्रसाद-मंजिरी ओक यांनी १२ ज्योतिर्लिंगांची यात्रा सुरु करण्याचा संकल्प केला आहे. त्यांनी शेअर केलेल्या पोस्टवर अनेकांनी 'हर हर महादेव', 'ओम नम: शिवाय' अशा कमेंट केल्या आहेत.
प्रसाद ओक आणि मंजिरी ओक हे मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय कपल आहेत. प्रसादच्या सिनेइंडस्ट्रीतील करिअरमध्ये मंजिरीने त्याची भक्कम साथ दिली आहे. अभिनेत्याच्या यशस्वी होण्यामागे मंजिरीचा मोठा वाटा आहे. प्रसाद आणि मंजिरी ही जोडी चाहत्यांनाही आवडते.