Hemant Dhome: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणे हिने गळफास घेऊन जीवन संपवल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. दरम्यान, मुळशी तालुक्यातील भुकूम येथे १६ मेला दुपारी साडेचारच्या सुमारास ही घटना घडली. सासरच्या मंडळींनी हुंड्यासाठी मानसिक शारीरिक छळ करून क्रूर वागणूक देऊन वैष्णवी हिच्या मृत्यूस कारणीभूत झाले आहेत, अशी तक्रार पोलिसांकडे करण्यात आली आहे. या घटनेचा संपू्र्ण राज्यभरातून तीव्र निषेध करण्यात येत आहे. अनेक राजकीय मंडळींसह कलाक्षेत्रातूनही या दुर्दैवी घटनेवर संताप व्यक्त करत आहेत. अशातच या प्रकरणी मराठी अभिनेता हेमंत ढोमेने (Hemant Dhome) संतप्त प्रतिक्रिया देत आपलं मत मांडलं आहे.
नुकतीच हेमंत ढोमे त्याच्या अधिकृत एक्स अकाउंटवर वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी पोस्ट लिहून संताप व्यक्त केला आहे. या पोस्टमध्ये त्याने लिहिलंय की, "वैष्णवी कस्पटे (मुळ नाव) आणि तेच वापरावं! ज्या आडनावाने तिचा बळी घेतला ते नकोच! या आपल्या बहिणीचा आजच्या काळात हुंडाबळी गेलाय! गेली अनेक वर्ष तिचा छळ झालांय… आणि त्या आईबापांचा देखील… लवकरात लवकर कठीण कारवाई झाली पाहिजे आणि यापुढे आपल्या महाराष्ट्रात तरी अशा घटना होऊ नयेत म्हणून आरोपींना कडक शिक्षा झाली पाहिजे." अशी पोस्ट लिहून अभिनेत्याने या घटनेवर नाराजी व्यक्त केली आहे.
नेमकं प्रकरण काय?
वैष्णवी हगवणे यांनी शुक्रवारी (१६ मे) राहत्या घरात गळफास घेतला. वैष्णवी यांचे वडील आनंद कस्पटे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, वैष्णवीच्या लग्नात ५१ तोळे सोने, फॉरच्यूनर गाडी, चांदीची भांडी देण्यात आली. त्यानंतर लग्नाच्या दुसऱ्या दिवसा पासून शशांक व तिचे सासु सासरे यांनी घरातील किरकोळ कामाच्या वादातून तिच्याबरोबर भांडण केले. लग्न झाल्यानंतर साधारण चार पाच महिन्यांनी शशांक यांची आई लता हगवणे यांनी चांदीची भांडी मागितली ती दिली नाहीत म्हणून त्याचा राग मनात धरुन वैष्णवी हिला त्रास देण्यास सुरुवात केली. तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन वैष्णवीला तिच्या सासऱ्याच्या लोकांनी शारीरिक व मानसिक त्रास देणे चालू केले होते. वैष्णवी हिचा पती, सासू-सासरे, नणंद आणि दीर यांनी हुंड्यासाठी मानसिक, शारीरिक छळ करून वैष्णवी यांना क्रूर वागणूक दिली. तिच्या मृत्यूस कारणीभूत झाले, तिच्या संपूर्ण अंगावर मारहाणीचे व्रण आढळून आले.