Sonali Kulkarni : मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने (Sonali Kulkarni) तिच्या सहज सुंदर अभिनयाने कलाविश्वात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. सोनाली कुलकर्णीने मराठीच नाही, तर अनेक उत्कृष्ट हिंदी सिनेमांमध्ये काम केलं आहे. विविध नाटक, मालिका, चित्रपट व सीरिज अशा तिन्ही माध्यमांमध्ये तिचा दांडगा वावर आहे. तसंच अनेक सामाजिक घटनांवर त्या आपलं परखड मत मांडताना दिसते. तितकंच ती कसदार लेखनही करते. त्यात आता काही दिवासांपूर्वीच दिलेल्या मुलाखतीमध्ये सोनाली कुलकर्णीने सोशल मीडियावर होणाऱ्या ट्रोलिंगवर भाष्य केलं आहे.
दरम्यान, अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने 'इसापनीती' या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. त्यावेळी अभिनेत्रीने कलाकारांच्या होणाऱ्या ट्रोलिंगवर आपलं मत मांडलं आहे. तसंच ट्रोलर्सना फटकारलं आहे. त्याविषयी बोलताना सोनाली म्हणाली,"सध्या कलाकारांची सांभाळून राहिलं पाहिजे, अशी जी भूमिका आहे त्याला कारण म्हणजे ट्रोलिंग नावाची जी गोष्ट उदयाला आली आहे तेच आहे. मला असं वाटतं ट्रोलर्ससाठी सामुदायिक सभा घेऊन त्यांचं म्हणणं ऐकलं पाहिजे. तुम्ही या आणि व्यक्त व्हा. तसेच आता हे का अरेरावीने किंवा बिनधास्तपणे बोललं जातंय? कारण मला कोणी बघतच नाही आहे. मी एका ठिकाणी बसून कलाकारांवर कमेंट करणार की, अरे! काय कपडे घातले आहेत. हीच का आपली संस्कृती? मी लिहून मोकळी झाले, पण कोणाला वेळ आहे ते बघायला की मी कोण आहे?"
त्यानंतर अभिनेत्रीने म्हटलं, "पण, माझं अस्तित्व मी दाखवणार मला खटकलेली गोष्ट मी बोलून दाखवणार. पण, मला आवडलेल्या गोष्टीबद्दल मी सांगते का? आक्षेप आपण हिरीरीने मांडतो पण तोच सिनेमा खूप सुंदर होता. आपल्याला एखादं चांगलं काही असेल तर ते का सांगावसं वाटत नाही. आपण माणूस आहोत आपल्याकडे मेंदू आहे. आपल्याकडे विचार करण्याची क्षमता आहे. मग सगळं नकारात्मक सांगायला आपल्याला का आवडतंय. कोणालातरी नेस्तनाबूत होईपर्यंत एखाद्या माणसाला आपण निशाण्यावर धरतो. हे फार दुर्दैवी आहे." असं म्हणत अभिनेत्रीने तिच्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत.