Join us  

'माझा वेळ का वाया घालवलास?' जेव्हा प्राजक्ताने आईलाच विचारला होता जाब

By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2023 4:59 PM

Prajakta mali: प्राजक्ता या ना त्या कारणामुळे कायम चर्चेत येत असते. परंतु, सध्या ती तिच्या आईमुळे चर्चेत येत आहे.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी. आपल्या मनमोहक सौंदर्य आणि दिलखेचक अदांमुळे प्राजक्ताने अल्पावधीत प्रेक्षकांना आपलंसं केलं. उत्तम अभिनय आणि तितकाच आत्मविश्वास यांच्या जोरावर प्राजक्ता लोकप्रिय होत आहे. एक अभिनेत्री असण्यासोबतच प्राजक्ता यशस्वी व्यावसायिकादेखील आहे. प्राजक्ताचा प्राजक्तराज हा दागिण्यांचा ब्रँडदेखील आहे. त्यामुळे प्राजक्ता या ना त्या कारणामुळे कायम चर्चेत येत असते. परंतु, सध्या ही अभिनेत्री तिच्या आईमुळे चर्चेत येत आहे.

लवकरच प्राजक्ताचा नवाकोरा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमाच्या निमित्ताने तिने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने तिच्या आईविषयी काही गोष्टींचा खुलासा केला. प्राजक्ताने आईच्या विरोधात जाऊन कॉलेजमध्ये आर्ट्स शाखा निवडली होती.विशेष म्हणजे अभिनयावर प्रेम असल्यामुळे तिने हा निर्णय घेतला होता.

"खरं तर मी फार गुणी मुलगी आहे. आई-वडिलांचं सगळं काही ऐकणारी मुलगी होते तेव्हा. पण, एकदा मी बंड पुकारलं. दहावीत असताना मला चांगले मार्क्स मिळाले होते. डिस्टिंशन होतं. त्यामुळे मी सायन्स घ्यावं अशी आईची इच्छा होती. पुढे डॉक्टर नाही तर इंजिनिअरिंग कर असं आईचं म्हणणं होतं. मात्र, मी आर्ट्सच घेणार यावर अडून राहिले", असं प्राजक्ता म्हणाली.

पुढे ती म्हणते, "मग मला वयाच्या ६ व्या वर्षापासून नाच का शिकवलास? मी एवढे वर्ष शिकून काय केलं मग आयुष्यात? माझा वेळ का वाया घालवलास? जर हेच करायचं होतं तर मी पहिल्यापासून तेच करत आले असते ना. नाचत का बसले?आता नाही. ही वेळ गेलीये त्यामुळे मी आर्ट्सचं घेणार. त्यानंतर आईने डोक्याला हात लावला. पण, मी कोणाचं काही ऐकलं नाही. थेट एसपी कॉलेजमध्ये जाऊन आर्ट्सला अॅडमिशन घेतलं."

दरम्यान, प्राजक्ता आज मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. प्राजक्ताने आजवर अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे. सध्या ती महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमात सूत्रसंचालिकेची भूमिका पार पाडत आहे. 

टॅग्स :प्राजक्ता माळीसेलिब्रिटीटेलिव्हिजनसिनेमा