Join us

'मी मराठी असल्याचा आणि माझ्या...'; बिकिनीवरुन ट्रोल करणाऱ्यांना मिताली मयेकरचं सडेतोड उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2023 07:52 IST

Mitali Mayekar: काही दिवसांपूर्वीच मितालीने सोशल मीडियावर तिचे बिकिनीतील फोटो शेअर केले होते.

लोकप्रिय मराठी अभिनेत्री मिताली मयेकर (mitali mayekar) सध्या तिच्या एका बिकिनी फोटोमुळे चर्चेत येत आहे. काही दिवसांपूर्वीच मितालीने सोशल मीडियावर तिचे बिकिनीतील फोटो शेअर केले होते. हे फोटो पाहिल्यावर अनेकांनी तिच्यावर टीकास्त्र डागलं. इतकंच नाही तर भारतीय स्त्रियांना खासकरुन मराठी मुलींना हे शोभत नाही, असं म्हणत अनेकांनी तिला प्रचंड ट्रोल केलं. त्यानंतर आता मितालीने पुन्हा एक व्हिडीओ शेअर करत या ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिलं आहे.

मितालीने तिचा साडीतला एक सुंदर व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत तिने ट्रोलर्सची बोलती बंद केली आहे. सोबतच महाराष्ट्रीयन मुलींनी कधी, कुठे कसं वागावं हे सुद्धा कॅप्शनच्या माध्यमातून सांगितलं आहे. 

'इतर लोक बीचवर काय घालतात आणि, महाराष्ट्रीयन लोकांना वाटतं की मराठी मुलींनी बीचवर हे असे कपडे घालायला हवेत, असं कॅप्शन तिने या व्हिडीओवर दिलं आहे. सोबतच, 'मी कपडे कोणतेही घातले तरी, माझी मुळं कधीच विसरले नाही आणि कधीही विसरणार नाही'. अभिमान आहे मला, मी मराठी असल्याचा आणि माझ्या मराठी संस्कृतीचा असं कॅप्शन तिने या व्हिडीओला दिलं आहे. 

मितालीने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये तिने काळ्या रंगाची बिकिनी परिधान केली आहे. त्यानंतर, लगेच ती काळ्या रंगाच्या साडीत दिसून येते. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेक सेलिब्रिटींनी तिला पाठिंबा दिला आहे.

दरम्यान, मितालीच्या या पोस्टवर सखी गोखले, अमृता खानविलकर यांनी कमेंट करत तिला पाठिंबा दिला आहे. गेल्या काही महिन्यांपासून मिताली सतत परदेशवारी करत आहे. आतापर्यंत तिने स्पेन, थायलंड, बाली या ठिकाणांना भेट दिली आहे.

टॅग्स :मिताली मयेकरसेलिब्रिटीसखी गोखले