Join us
Daily Top 2Weekly Top 5

'मला माहितीये माझं लग्न झालंय'; मंगळसूत्र न घातल्यामुळे खोचक प्रश्न विचारणाऱ्यांना क्षितीचं सडेतोड उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2024 13:10 IST

Kshitee jog: क्षितीने नुकतीच एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने तिच्यासोबत घडलेला किस्सा सांगितला आहे.

मराठी कलाविश्वातील बिनधास्त आणि बेधडकपणे मत मांडणारी अभिनेत्री म्हणजे क्षिती जोग (kshiti jog). उत्तम अभिनय कौशल्याच्या जोरावर क्षितीने कलाविश्वात तिचं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. मराठीसह हिंदी मालिकांमध्येही ती झळकली आहे. सध्या क्षिती तिच्या एका मुलाखतीमुळे चर्चेत येत आहे. या मुलाखतीमध्ये तिने लग्न झालेल्या स्त्रियांना कायम जज करणाऱ्या व्यक्तींचे कान खेचले आहेत.

अलिकडे क्षितीने 'आरपार' या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने एका कार्यक्रमात तिच्यासोबत घडलेला किस्सा सांगितला. मंगळसूत्र न घातल्यामुळे काही जणांनी तिला कशाप्रकारे खोचक प्रश्न विचारले होते हा किस्सा सांगत तिने तिचं मत मांडलं.

नेमकं काय म्हणाली क्षिती?

"लग्नानंतर एक-दीड वर्षाने मी कुठल्या तरी कार्यक्रमाला गेले होते आणि तेव्हा मंगळसूत्र घातलं नव्हतं. तर तिथे एका व्यक्तीने विचारलं, तुझं नुकतंच लग्न झालंयं ना मग तू मंगळसूत्र घातलं नाही. माझं असं झालं की, त्याला माहितीये ना मी त्याची बायको आहे. आणि, मलाही माहितीये की तो माझा नवरा आहे. मग तुला माहित असो किंवा नसो काय फरक पडतोय मला. ते घातल्याने काय होणार आहे. म्हणजे मला मंगळसूत्र खूप आवडतं. सगळ्यात सुंदर दागिना आहे तो. पण, ते माझ्या मनावर आहे. माझ्या मनात आलं तर मी साडी, गजरा, टिकली असं सगळं घालेन. पण, नाही वाटलं तर मग नाही. हे मी तुमच्यासाठी करत नाही ते माझ्यासाठी करते," असं क्षिती म्हणाली.

पुढे ती म्हणते, "मला माहितीये माझं लग्न झालंय. मग मंगळसूत्र घातलं काय आणि न घातलं काय. त्याला नाही कोणी विचारत ते की, 'अरे तुझं लग्न झालंय मग ती मुलगी किती छान दिसते असं का म्हणालास तू?' असं नाही होत ना. म्हणजे तो सहज गप्पा मारतो ना, 'अरे ही किती छान दिसते', हे चालतं. असे बोर असतात लोकं. त्यांना असा 'वेल्ला टाइम' असतो. आणि, घरी वेळीच आईने फटके न घातल्यामुळे हे झालंय. मला तर नेहमी असं वाटतं आईने वेळीच धपाटे घातले असते ना ही वेळच नसती आली."

दरम्यान, क्षिती कायम तिच्या स्पष्टवक्तेपणामुळे चर्चेत येत असते. अलिकडेच ती 'झिम्मा 2' या सिनेमात झळकली होती. तिने मराठीसह काही हिंदी मालिका, सिनेमांमध्येही काम केलं आहे. यात 'ये रिश्ता क्या कहलाता हैं' या मालिकेतील तिची भूमिका बरीच गाजली होती.

टॅग्स :सिनेमासेलिब्रिटीबॉलिवूडटेलिव्हिजन