मराठी सिनेसृष्टीतील बोल्ड, बिनधास्त आणि लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे क्रांती रेडकर. सध्या क्रांती अभिनयापासून दूर असली तरी सोशल मीडियावरुन चाहत्यांचं पुरेपूर मनोरंजन करताना दिसते. अनेक मजेशीर रील व्हिडीओ क्रांती बनवत असते. तर काही व्हिडीओंमधून क्रांती तिच्या जुळ्या लेकींच्या गमतीजमती सांगत असते. पण, सतत व्हिडीओ बनवणाऱ्या क्रांतीला चाहत्यांनी एवढे व्हिडीओ बनवतेस तर काम कधी करतेस? असा प्रश्न विचारला. या प्रश्नालाही क्रांतीने रील व्हिडीओ बनवतच उत्तर दिलं आहे.
क्रांतीने तिच्या इन्स्टाग्रामवरुन नवीन व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये ती म्हणते, "बायका मला विचारतात एवढे व्हिडीओ बनवतेस तर काम कधी करतेस? ए बाई...जेव्हा तू माझे व्हिडीओ बघतेस तेव्हा मी कामं करते...खरंच". क्रांतीचा हा मजेशीर व्हिडिओ पाहून चाहत्यांना हसू अनावर झालं आहे. तिच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत.
दरम्यान, क्रांतीने अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. 'कोंबडी पळाली' या गाण्यामुळे तिला प्रसिद्धी मिळाली. क्रांतीने खूप कमी वयातच अभिनयात करिअर करायला सुरुवात केली होती. 'माझा नवरा तुझी बायको', 'फक्त लढ म्हणा', 'जत्रा', 'करार', 'फूल ३ धमाल' अशा अनेक सिनेमांमध्ये तिने काम केलं आहे.