Join us
Daily Top 2Weekly Top 5

​या मराठी अभिनेत्रीने घेतले आहे पत्रकारितेचे शिक्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2018 12:10 IST

सोनाली कुलकर्णीने आज मराठी चित्रपटसृष्टीत तिचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. तिच्या कारकिर्दीला नुकतेच १० वर्षं पूर्ण झाले ...

सोनाली कुलकर्णीने आज मराठी चित्रपटसृष्टीत तिचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. तिच्या कारकिर्दीला नुकतेच १० वर्षं पूर्ण झाले आहेत. सोनालीचा आज वाढदिवस असून तिने वयाची 30 वर्षं पूर्ण केली आहेत. सोनालीने मराठी चित्रपटसृष्टीत आपले नाव कमावले असून तिने एकाहून एक हिट चित्रपट दिले आहेत. तिने अनेक हिंदी चित्रपटातही काम केले आहे. नटरंग या चित्रपटातील अप्सरा आली हे तिचे गाणे प्रचंड गाजले होते. या चित्रपटानंतर तिला मराठी चित्रपटसृष्टीतील अप्सराच म्हटले जाते. तिने अंजिठा, पोस्टर गर्ल, झपाटलेला २, मितवा, क्लासमेट यांसारख्या चित्रपटांमध्ये दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. बकुळा नामदेव घोटाळे या तिच्या पहिल्या चित्रपटासाठी अनेक पुरस्कार देखील मिळाले होते. सोनालीचे वडील हे मराठी असले तरी तिची आई ही पंजाबी आहे. त्यामुळे सोनाली ही मराठी असली तरी पूर्वी अस्खलित मराठी बोलता येत नव्हते. मराठी चित्रपटसृष्टीत करियर करायचे असे तिने ठरवल्यानंतर तिने मराठी शिकायला सुरुवात केली. तिचे वडील मनोहर कुलकर्णी लष्करात डॉक्टर होते आणि आईही लष्करातच नोकरी करत होती. त्यामुळे तिचा जन्मदेखील मिलिट्री हॉस्पिटलमध्ये झाला. सोनाली ही मुळची पुण्याची असून ती गेल्या काही वर्षांपासून मुंबईत राहात आहे. सोनालीचे शिक्षण आर्मी स्कूल, केंद्रिय विद्यालयातून झाले. त्यानंतर पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमध्ये तिने प्रवेश घेतला. मास कम्युनिकेशन अँड जर्नालिझम या विषयात सोनालीने पदवीप्राप्त केली आहे. तसेच इंदिरा स्कूल ऑफ कम्युनिकेशन या संस्थेतून रेडिओ, टेलिव्हिजन अँड फिल्म प्रॉडक्शनमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केले आहे. सोनालीने एका सौंदर्य स्पर्धेत सहभाग घेतला होता. या स्पर्धेचे उपविजेतेपद तिला मिळाले होते आणि तिथूनच तिच्या ग्लॅमरस करियरला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. तिला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. ही स्पर्धा जिंकल्यावर तिने जाहिरातीमध्ये काम करायला सुरुवात केली. हा खेळ संचिताचा ही तिची पहिली मालिका होती. त्यानंतर तिने गाढवाचं लग्न या चित्रपटात काम केले. या चित्रपटातील तिची भूमिका छोटी असली तरी याच भूमिकेमुळे तिला बकुळा नामदेव घोटाळे या चित्रपटात मुख्य भूमिका साकारण्याची संधी मिळाली. या चित्रपटानंतर तिने कधीच मागे वळून पाहिले नाही. आज मराठीतील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये तिची गणना केली जाते. सोनालीच्या नृत्याची तारीफ आज सगळेच करतात. पण नटरंग या चित्रपटाच्या आधी सोनाली इतकी चांगली नर्तिका नव्हती. तिने या चित्रपटाच्या आधी नृत्यावर खूपच मेहनत घेतली.  Also Read : ​सोनाली कुलकर्णी का आहे प्रचंड खूश?