Join us

"सेटवर एका जोगतीणीच्या अंगात आलं अन्...", अभिनेत्री अदिती देशपांडेंनी सांगितला 'जोगवा'चा थरारक किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 15:36 IST

"सेटवर एका जोगतीणीच्या अंगात आलं अन्...", अभिनेत्री अदिती देशपांडेंनी सांगितला 'जोगवा' च्या वेळी घडलेला 'तो' किस्सा

Aditi Deshpande: मराठी चित्रपटसृष्टीत आजवर वेगवेगळ्या विषयांवर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. मात्र,त्यातील काही काही चित्रपट आजही सिनेरसिकांच्या मनात अजूनही घर करुन आहेत. याच यादीतील एक नाव म्हणजे जोगवा चित्रपट. राजीव पाटील दिग्दर्शित 'जोगवा' चित्रपट २००९ साली प्रदर्शित झाला. या चित्रपटात उपेंद्र लिमयेंनी साकारलेला 'तायप्पा' च्या भूमिकेचं सर्वत्र कौतुक झालं.जोगवा चित्रपटातून जोगते आणि जोगतीण यांच्या जीवनावर प्रकाश टाकण्यात आला आहे. या भूमिकेसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार देखील देण्यात आला होता. दरम्यान, या चित्रपटात अभिनेत्री अदिती देशपांडेंनी ताणू अक्का ही भूमिका साकारली होती. अशातच अलिकडेच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी या चित्रपटासंदर्भात काही किस्से शेअर केले आहेत. 

नुकतीच अदिती देशपांडे यांनी 'राजश्री मराठी'ला मुलाखत दिली. त्यादरम्यान,अभिनेत्रीने जोगवा सिनेमाच्या सेटवर घडलेला एक प्रसंग सांगितला. तो किस्सा शेअर करताना त्या म्हणाल्या, "जोगवा सिनेमाचं शूटिंग करताना त्यावेळी सेटवर जोगतीणी आल्या होत्या. त्याचं असं असतं की एकदा की देवीचं गाणं किंवा प्रार्थना वगैरे सुरु झालं की त्यांच्या अंगात येतं. तेव्हा ते सेटवर आले होते आणि सगळ्याच्या अंगात यायला लागलं. ते पाहून आम्ही खूप घाबरलो होतो. त्यानंतर काहींनी आम्हाला सांगितलं की, तुम्ही साडीच्या पदराला गाठ मारा. कारण, तसं केलं तर आपल्या अंगात येत नाही, अशी त्यांची धारणा आहे. तो अनुभव मी 'झुलवा' सिनेमाच्या वेळी देखील ऐकला होता. त्यावेळी देखील आम्ही प्रयोग करताना समोर असलेल्या जोगतीणींच्या अंगात आलं होतं."

त्यानंतर पुढे त्या म्हणाल्या, "हे सगळं समोर घडताना बघून असं वाटतं की, काय या लोकांचं आयु्ष्य आहे! जोगवामध्ये या प्रथेतून लोकांना बाहेर पडण्याचा संदेश देण्यात आला होता. तर त्या बायका आम्हाला म्हणायच्या 'आम्ही यातून बाहेर पडून काय करणार?' त्यातीलच एका बाईने मला विचारलं, 'तुम्ही या चित्रपटातून सांगताय की या प्रथेतून बाहेर पडा. पण, समाज आमचा स्वीकार करेल का?' आम्हाला आमच्या मुलांना यात अडकवायचं नाही, पण मी काय करू सांगा'. तर अशा काही संस्था आहेत ज्या या जोगतीणी किंवा त्यांच्या मुलांना शिक्षण दिलं जातं. त्यांना त्यांच्या पायावर उभं राहायला मदत केली जाते. मग मी त्या जोगतीणीला माझ्या ओळखीतसे काही नंबर दिले. पण, पुढे त्याचं काय झालं मला याबद्दल माहित नाही." असा खुलासा त्यांनी या मुलाखतीमध्ये केला. 

दरम्यान, 'जोगवा' हा मराठीतील हा कल्ट क्लासिक चित्रपटांपैकी एक होता, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. 'जोगवा'मध्ये उपेंद्र लिमये यांच्यासह मुक्ता बर्वे, प्रिया बेर्डे, किशोर कदम, अदिती देशपांडे आणि चिन्मय मांडलेकर स्मिता तांबे,अमिता खोपकर अशा कलाकारांची फौज होती.

टॅग्स :मराठी चित्रपटसेलिब्रिटीउपेंद्र लिमये